बारवे ते जकीन पेठ रस्ताकामास मुख्यमंत्र्याकडून खास बाब म्हणून परवानगी : आबिटकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:20 AM2021-05-29T04:20:14+5:302021-05-29T04:20:14+5:30
ऐतिहासिक किल्ले भुदरगडकडे जाणाऱ्या बारवे ते जकीन पेठ या साडेपाच किमी रस्त्याचे काम निधी मंजूर असतानाही केवळ वन विभागाने ...
ऐतिहासिक किल्ले भुदरगडकडे जाणाऱ्या बारवे ते जकीन पेठ या साडेपाच किमी रस्त्याचे काम निधी मंजूर असतानाही केवळ वन विभागाने आडकाठी आणल्यामुळे अर्धवट स्थितीत होते. गेली तीन वर्षे प्रलंबित असणाऱ्या या रस्त्यास वन विभागाने परवानगी नाकारल्यामुळे रस्त्याचे काम थांबले होते. सदर रस्त्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री सडक योजनेतून ४ कोटी ८३ लाख निधी मंजूर करून घेतला होता.
वन विभागाच्या लालफितीच्या कारभारात रेंगाळत पडलेल्या या कामाचा आमदार आबिटकर यांनी सतत पाठपुरावा केल्याने याची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून खास बाब म्हणून या रस्त्यासाठी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे खडीकरण पूर्ण असणाऱ्या रस्त्यावर आता डांबरीकरण होऊन सदर रस्त्याचे काम मार्गस्थ लागून वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
भुदरगड तालुक्यातील किल्ले भुदरगडला ऐतिहासिक स्थळ म्हणून पाहिले जाते. गडावर भैरीचे देवस्थान असून अगदी दूरवरून कर्नाटकातूनही भाविक भैरीच्या दर्शनासाठी येत असतात. ऐतिहासिक किल्ले भुदरगडकडे बारवेमार्गे जाताना मोठी कसरत करत जावे लागते. त्यामुळे या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी मंजूर करण्यात आला. तब्बल साडेपाच किलोमीटर असणाऱ्या या रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली असल्याने व अगदी बऱ्याच वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण झाले असल्याने रस्त्यावर फक्त खड्ड्यांचेच साम्राज्य व पावसाळ्यात मोठमोठ्या खड्ड्यांत पाणी साचून रस्त्याला ओढ्याचे स्वरूप प्राप्त होते. प्रत्येक रविवारच्या दिवशी भैरीच्या दर्शनासाठी भाविक तसेच हिरवाईने नटलेला गड पाहण्यासाठी हौशी पर्यटकांची गडावर गर्दी असते. पण या रस्त्याने प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.