बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 04:58 PM2020-02-25T16:58:00+5:302020-02-25T17:01:19+5:30
बारावी परीक्षेतील उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम सुरू झाले आहे. नियामकांच्या बैठका होऊन उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परीक्षकांकडे पाठविण्यात येत आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागात विनाअनुदानित शिक्षकांनी परीक्षा कामकाजावर टाकलेल्या बहिष्काराचा परिणाम झालेला नाही.
कोल्हापूर : बारावी परीक्षेतील उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम सुरू झाले आहे. नियामकांच्या बैठका होऊन उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परीक्षकांकडे पाठविण्यात येत आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागात विनाअनुदानित शिक्षकांनी परीक्षा कामकाजावर टाकलेल्या बहिष्काराचा परिणाम झालेला नाही.
परीक्षा दि. १८ फेब्रुवारीपासून सुरू झाली. मंगळवारपर्यंत इंग्रजी, मराठी, हिंदी, ऊर्दू, सहकार, राज्यशास्त्र, भौतिकशास्त्रासह किमान कौशल्य अभ्यासक्रमाचे (एमसीव्हीसी) एकूण २९ पेपर झाले आहेत.
पेपर झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी उत्तरपत्रिका तपासणीबाबत काही शंका असल्यास त्याबाबत चर्चा करून उत्तरपत्रिका या तपासणीसाठी मुख्याध्यापक, प्राचार्यांच्या माध्यमातून परीक्षकांकडे पाठविण्यात येत आहे. नऊहून अधिक उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू झाले आहे.
विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन कृती समितीने बारावी परीक्षेचे कामकाज आणि उत्तरपत्रिका तपासणीवर, तर राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने बारावी आणि दहावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. त्याबाबतची माहिती या संघटनांचे निवेदन मिळाल्यानंतर लगेचच राज्य शिक्षण मंडळाला कळविले आहे. मंडळाच्या सूचनेनुसार बारावी परीक्षेचे कामकाज कोल्हापूर विभागात सुरू असल्याचे सचिव आवारी यांनी मंगळवारी सांगितले.