डोंगर विकास, पर्यटनासाठी बारा कोटी मंजूर
By admin | Published: August 4, 2015 12:15 AM2015-08-04T00:15:26+5:302015-08-04T00:16:48+5:30
चंद्रकांत पाटील : विकास कामांचा आराखडा तयार करण्याचे आदेश; जिल्हा प्रशासन प्रस्ताव देणार
सांगली : जिल्ह्यातील डोंगर विकास व पर्यटनाला चालना देण्यासाठी बारा कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून, यासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आल्याची माहिती सहकार व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. पालकमंत्री पाटील यांनी सायंकाळी डोंगर विकास व पर्यटन विकासासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला खा. संजय पाटील, आ. शिवाजीराव नाईक, आ. अनिल बाबर, आ. सुरेश खाडे, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, पोलीस अधीक्षक सुनील फुलारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते म्हणाले, जिल्ह्यातील डोंगर विकास योजनेसाठी राज्य शासनाने दोन कोटीचा निधी मंजूर केला आहे. यामधील शिराळा तालुक्यासाठी १ कोटी, कडेपूर तालुक्यासाठी ५० लाख व खानापूर तालुक्यासाठी ५० लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. डोंगर विकासासाठी जिल्हा प्रशासनाकडून कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यानुसार हा निधी खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये अंगणवाड्यांच्या इमारतीचे बांधकाम, अंतर्गत रस्ते, सोयी-सुविधांचा समावेश आहे.
त्याचबरोबर जिल्ह्यातील पर्यटनाच्या विकासाठी दहा कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठीही जिल्हा प्रशासन कृती आराखडा सादर करणार आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पर्यटन महामंडळाला सादर करण्यात येणार आहे. या निधीमधून पर्यटनासाठी अंतर्गत रस्ते, स्थानिक सोयी-सुविधा, दिशादर्शक व माहिती फलक आदींचा समावेश असणार आहे. जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांच्या सुचविलेल्या प्रस्तावानुसार तीर्थक्षेत्र व पर्यटनाचा विकास करताना यामधील दहा टक्के निधी हा पोलीस चौकी उभारणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे व सुरक्षा व्यवस्थेसाठी खर्च करण्यात येणार आहे.
जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी यापूर्वी साडेचारशे कोटीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला असून, याअंतर्गत हा निधी खर्च करण्यात येणार आहे.आ. शिवाजीराव नाईक यांनी चांदोली अभयारण्य व धरणाच्या पर्यटन विकासासाठी प्रस्ताव तयार केला असून, त्यांच्या शिफारशीची दखल घेऊन उपाययोजना करण्यात येणार आहे. यावरही प्रशासनाकडून प्रस्ताव घेऊन तो प्रस्ताव पर्यटन महामंडळाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहितीही पालकमंत्री पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)
तीर्थक्षेत्रे व पर्यटनाचा विकास करणार
जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रे व पर्यटनाचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी ५० लाख ते कोटी रुपयांपर्यंत निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये सांगलीचे गणपती मंदिर, कृष्णा घाट, मिरज दर्गा, हरिपूरचे संगमेश्वर मंदिर, हातनूरचे होनाई मंदिर, सिध्दनाथ मंदिर, खानापूर, चांदोली अभयारण्य, बिरोबा मंदिर, आरेवाडी, औदुंबर तीर्थक्षेत्र, ब्रह्मनाथ मंदिर, खंडेराजुरी आदींचा समावेश आहे.
मगर हल्ल्यातील मृताच्या कुटुंबास आठ लाख
भिलवडी येथे दोन महिन्यापूर्वी मगरीच्या हल्ल्यात बळी पडलेल्या वसंत मोरे यांच्या कुटुंबियांना सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते आठ लाखाचा निधी देण्यात आला. यामधील सात लाख रुपये कुटुंबियांच्या नावे अनामत ठेव ठेवण्यात आली असून, एक लाख रुपयांचा धनादेश आज सुपूर्द करण्यात आला.