करवीर तालुक्यातील बारा वाड्यांनी रोखले कोरोनाला वेशीबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:17 AM2021-06-03T04:17:52+5:302021-06-03T04:17:52+5:30
मार्च २०२० पासून कोरोना महामारीची कोल्हापूर जिल्ह्यात पहिली लाट सुरू झाली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या व ती ...
मार्च २०२० पासून कोरोना महामारीची कोल्हापूर जिल्ह्यात पहिली लाट सुरू झाली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या व ती आवाक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने शर्थींचे प्रयत्न केले; पण पुन्हा एप्रिल २०२१ मध्ये जिल्ह्यात कोरोनाची लाट आली असून, करवीर तालुक्यातील अनेक गावे हॉटस्पॉट बनू लागली आहेत. मात्र याला अपवाद करवीर तालुक्यातील पश्चिमेला असणारी डोंगरदऱ्यात वसलेले दोन गावे व १२ वाड्यावस्त्या. बोलोली ग्रुप ग्रामपंचायत असून या अंतर्गत माळवाडी, शिपेकरवाडी, कारंडेवाडी, विठ्ठलाईवाडी, दुर्गुळेवाडी, स्वयंभूवाडी या सहा वाड्या व एक मठाणा धनगरवाडा आहे. तर उपवडेमध्ये न्हाव्याची वाडी, कारंडेवाडी, आरडेवाडी, तांबोळकर वाडी या चार वाड्या व मारुतीचा धनगरवाडा आहे. या दोन गावांत व १२ वाड्यात साधारणतः साडेसात हजार लोकसंख्या आहे. कोल्हापूर शहरापासून अवघ्या १५ ते १६ कि. मी. अंतरांवर असणाऱ्या डोंगरदऱ्याच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य गावे व वाड्या पहिल्या लाटेपासून कोरोनामुक्त आहेत.
गावाच्या जवळ असणारी आमशी, सांगरूळ, खाटांगळे, म्हारूळ ही गावे कोरोना हॉटस्पॉट असताना या दोन गावे व १२ वाड्यांनी कोरोनाला गावाच्या वेशीबाहेर ठेवण्यात यश आले आहे.
प्रतिक्रिया
भरपूर वनसंपदा, डोंगररांगांच्या सानिध्यात राहण्याची येथील लोकांची सवय यामुळे प्रतिकारशक्ती मोठी आहे. याशिवाय भरपूर ऑक्सिजन मिळत असून, लोकांच्यात सकारात्मक भाव आहे. याचा परिणाम येथे कोरोनाला एन्ट्री नाही.
-सागर राणे (ग्रामस्थ बोलोली)
सातेरी महादेव, मारुतीचा डोंगर, तुमजाईचा डोंगर अशी निसर्ग संपन्न वातावरणात वसलेली गावे व १२ वाड्या वस्त्या.