बारा तासांची वीज आता आठ तासांवर

By admin | Published: November 18, 2016 11:09 PM2016-11-18T23:09:44+5:302016-11-18T23:09:44+5:30

शेतकरी अडचणीत : गरज असलेल्या काळात चार तास वीज कपात

Twelve hours of electricity is now eight hours | बारा तासांची वीज आता आठ तासांवर

बारा तासांची वीज आता आठ तासांवर

Next

प्रकाश पाटील -- कोपार्डे सलग १२ तास वीज देण्याची मुदतवाढ नसल्याने आता शेती पंपासाठी पुन्हा बारा तासांऐवजी आठ तासच वीजपुरवठा करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सध्याच्या उन्हाच्या तडाख्यात ऊस पिकांना पाण्याची आवश्यकता असताना वीजकपातीचा निर्णय चुकीचा असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहेत.
आॅक्टोबर महिन्यात राज्य शासनाने रब्बी हंगामाकरिता सलग १२ तास वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार रात्री १० ते सकाळी १०, तर दिवसा सकाळी १० ते रात्री १० अशी वीज शेतीपंपाना देण्यात येत होती. काही ठिकाणी अनेक अडचणींवर मात करून सुरळीत वीजपुरवठाही सुरू होता. ही मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत होती. त्यानंतर पुन्हा १२ तासांऐवजी वीजपुरवठा आठ तास करण्यात येत आहे. ही मुदत वाढविण्याबाबत शासनाकडून विद्युत वितरण कंपनीला कोणताच आदेश आला नसल्याने मंडळाने आठ तासच वीज देण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.
काही ठिकाणी अवकाळी किंवा परतीच्या पावसाने दांडी मारली असून, पिकांना पाण्याची मोठी गरज आहे. विशेष करून दुष्काळी पट्ट्यात अजिबातच पाऊस झाला नव्हता. तेथे परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने विहीर, नद्या, धरणे, तलावात आता पाण्याची उपलब्धता आहे. हे पाणी वेळेवर रब्बी पिकांना मिळाले तर उत्पादनात वाढ होणार आहे. मात्र, यासाठी शेतीपंपासाठी किमान १२ तास वीज पुरवठा पूर्वीप्रमाणे व्हावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

सहवीज प्रकल्पातून वीज खरेदी करावी
अलीकडे सहवीज प्रकल्पातून तयार झालेली वीज महाग पडत असल्याने महावितरणने ती खरेदी करण्यास नकार दिला आहे. मात्र, ही वीज खरेदी करून कमी पडणारी वीज उपलब्ध होईल. साखर कारखान्यांना त्यातून जादा उत्पन्न मिळेल व उसाला जादा दर देण्यासाठी त्याचा उपयोग होईल. म्हणून सहवीज प्रकल्पातून उत्पादित होणारी वीज खरेदी करावी, अशी मागणी होत आहे.


शेतीसाठी पाण्याची गरज डिसेंबरनंतरच जास्त लागते. शेतीपंपांना वीज योग्य प्रमाणात दिल्यास पिकाला पाणी देऊन उत्पन्न वाढण्यास मदत होईल. मागील वर्षी पाण्याच्या कमतरतेमुळे उपसाबंदी लागू झाली. यामुळे पिकाच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती. यावर्षी पाऊस भरपूर झाला असून, पाणी भरपूर आहे. पण वीज नसल्यास शेतकऱ्यांचे हात मोडल्यासारखे होईल. यामुळे पूर्वीप्रमाणे १२ तास वीजपुरवठा व्हावा.
- संजय जोतिराम पाटील, शेतकरी, वाकरे, ता. करवीर

Web Title: Twelve hours of electricity is now eight hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.