संचारबंदीतील सव्वादोन हजार गुन्हे होणार रद्द !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 04:43 PM2021-02-03T16:43:05+5:302021-02-03T16:45:43+5:30
police Kolhapur-कोविड कालावधीत संचारबंदीचे उल्लंघन केलेले गुन्हे काढून घेण्याबाबत गृहमंत्रालय पातळीवर सूचना दिल्या आहेत. तसा अध्यादेश अद्याप कोल्हापूर पोलीस दलापर्यंत पोहोचलेला नाही. तसे झाल्यास कोविड कालावधीत जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांत दाखल असलेले संचारबंदी उल्लंघनाचे सुमारे २२३९ गुन्हे रद्द होणार आहेत.
तानाजी पोवार
कोल्हापूर : कोविड कालावधीत संचारबंदीचे उल्लंघन केलेले गुन्हे काढून घेण्याबाबत गृहमंत्रालय पातळीवर सूचना दिल्या आहेत. तसा अध्यादेश अद्याप कोल्हापूर पोलीस दलापर्यंत पोहोचलेला नाही. तसे झाल्यास कोविड कालावधीत जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांत दाखल असलेले संचारबंदी उल्लंघनाचे सुमारे २२३९ गुन्हे रद्द होणार आहेत.
खरे कोविड योध्दे म्हणून जिवाची बाजी लावून काम करणारे पोलीस व आरोग्य विभागातील डॉक्टर्ससह कर्मचाऱ्यांवरील हल्ले वगळता इतर गुन्हे मागे घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुन्हे दाखल झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
कोरोना महामारीत मार्चअखेरपासून सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात पोलीस, जिल्हा परिषद, महानगरपालिका, तसेच आरोग्य प्रशासन यांनी संयुक्तपणे परिश्रम घेतल्याने कोरोनाला पळवून लावले. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागली. जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत पुकारलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भा.द. स. कलम १८८ अंतर्गत गुन्हे नोंदवले. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हे गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयाप्रत शासन आले आहे.
पोलीस, डॉक्टरांवरील हल्ल्यांचे गुन्हे जैसे थे
लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात पोलिसांवर हल्ल्यांच्या १८ घटना घडल्या, तर आठ पोलीस जखमी झाले, हल्लाप्रकरणी ८५ जणांना अटक केली. याशिवाय डॉक्टर्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात ४, भुदरगड पोलीस ठाण्यात २, तर शाहुवाडी, करवीर व पन्हाळा पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल झाला. हे हल्ल्याचे गुन्हे जैसे थे ठेवून इतर उल्लंघनाचे गुन्हे रद्द करण्याची शक्यता आहे.
गुन्हे काढून घेण्याची प्रक्रिया
शासनाने गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, तसेच शासकीय अधिकाऱ्यांची कमिटी नेमली जाते. त्यामध्ये गुन्ह्याची गांभीर्यता पाहून कोणते गुन्हे मागे घ्यायचे हे ठरते.
कोरोना कालावधीत विविध दाखल गुन्हे
- संचारबंदी आदेशाचे उल्लंघन : २२३९ गुन्हे
- विनापरवाना वाहन प्रवास : १२८
- क्वारंटाईन नियम उल्लंघन : १७३ गुन्हे (कारवाई : २४०)
- अफवा पसरवणे : ५२जादा वेळ दुकान, हॉटेल सुरू ठेवणे : १६२४
- पोलिसांवरील हल्ले : ८५ जणांना अटक (घटना : १८, जखमी पोलीस : ८)
इतर पॉईंटर....
- एकूण अटक : २८५
- वाहने जप्त : ९०११ (काही कालावधीपुरती)
- वाहनांवर गुन्हे : ४८३४
- दंड वसूल : २ कोटी ७० लाख ८७ हजार रुपये
शासन कोविड कालावधीतील संचारबंदी उल्लंघनाचे गुन्हे मागे घेण्याबाबत विचारविनिमय करत आहे, तसा निर्णयाचा अध्यादेश कोल्हापूर पोलीस दलास मिळाल्यास पोलिसांसह सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचे गुन्हे वगळता इतर गुन्हे मागे घेण्याची शक्यता आहे.
- शशिराज पाटोळे ,
पोलीस निरीक्षक, जि. वि. शा.