बारा वर्षानंतर लोकमत’ मधील छायाचित्राने घडली संकेश्वरमधील ‘माय-लेकरा’ची भेट- अश्रूंचा बांध फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 04:34 PM2018-11-21T16:34:01+5:302018-11-21T17:52:14+5:30
घोसरवाड (ता. शिरोळ) मधील जानकी वृद्धाश्रमामधील ज्येष्ठ नागरिकांबाबतची बातमी ‘लोकमत’मध्ये छायाचित्रासह प्रसिद्ध झाली. या बातमीतील छायाचित्राने तब्बल बारावर्षांनंतर संकेश्वरमधील लक्ष्मी आणि निलेश बाबर या माय-लेकराची
- संतोष मिठारी
कोल्हापूर : घोसरवाड (ता. शिरोळ) मधील जानकी वृद्धाश्रमामधील ज्येष्ठ नागरिकांबाबतची बातमी ‘लोकमत’मध्ये छायाचित्रासह प्रसिद्ध झाली. या बातमीतील छायाचित्राने तब्बल बारावर्षांनंतर संकेश्वरमधील लक्ष्मी आणि निलेश बाबर या माय-लेकराची भेट घडवून आणली. त्यांच्या भेटीने वृद्धाश्रम गहिवरून गेले.
मूळच्या संकेश्वर (कर्नाटक) येथील असलेल्या लक्ष्मी आणि त्यांचा मुलगा निलेश यांची बारा वर्षांपूर्वी ताटातूट झाली. त्याच दरम्यान लक्ष्मी यांचा अपघात झाला. त्यामध्ये त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला. त्यांच्या पायाला मार बसल्याने काहीसे अपंगत्व त्यांना आले. त्यांना त्यांचे गाव, कुटुंब याबाबत काहीच नीट सांगता येत नव्हते.
सीपीआर रूग्णालयातील उपचारानंतर त्या कोल्हापूर शहर, जिल्ह्यात फिरत राहिल्या. कबनूर येथे त्या असताना त्यांची अवस्था काही नागरिकांनी जानकी वृद्धाश्रमाच्या बाबासाहेब पुजारी यांना सांगितली. त्यावर पुजारी यांनी त्यांना आपल्या वृध्दाश्रमात नेले. त्यांच्यावर उपचार सुरू केले. वर्षभरापासून त्या यावृद्धाश्रमात राहत आहेत. ‘मुलाची ठोकर, पण नातवाची वृद्धाचा दु:खावर मायेची फुंकर’ हे वृत्त ‘लोकमत’च्या दि. १५ नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाले. या बातमीसमवेत वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांचे एकत्रित छायचित्र देखील प्रसिद्ध झाले होते. ती बातमी वाचून आणि छायाचित्र पाहून लक्ष्मी यांचा मुलगा निलेश याने दि. १६नोव्हेंबरला जानकी वृद्धाश्रम गाठले. त्याला लक्ष्मी यांनी ओळखले नाही. आईची अवस्था पाहून त्याच्या अश्रूंचा बांध फुटला. त्याने आपल्या समवेत आणलेले खाद्यपदार्थ आईला भरविले. आई भेटल्याचे समाधान त्याच्या आनंदी चेहऱ्यावरून दिसून येत होते. तब्बल बारा वर्षानंतर झालेली या माय-लेकराची भेट पाहून वृद्धाश्रमातील सर्वजण गहिवरून गेले.
‘लोकमत’चे आभार
दत्तनगर (कबनूर) येथे ६० वर्षीय लक्ष्मी बाबर या एका पडक्या घरात असल्याचे मला समजले. त्यांची परिस्थिती पाहून, माहिती घेतल्यानंतर त्यांना वृद्धाश्रमात आणले. वैद्यकीय उपचार आणि देखभालीमुळे त्यांची प्रकृती सुधारली. त्या नेहमी म्हणत असत की, माझा एक बाळ आहे, पण कुठे आहे माहित नाही. ‘लोकमत’ मुळे त्यांना त्यांचा मुलगा भेटला. ते पाहून मला खूप आनंद झाला असल्याचे जानकी वृद्धाश्रमाचे बाबासाहेब पुजारी सांगितले. ते म्हणाले, या माय-लेकराची भेट घडविल्याबद्दल मी ‘लोकमत’चे आभार मानतो. लक्ष्मी यांचा मुलगा निलेश हा कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये काम करून उदरनिर्वाह करीत आहे. त्याने दर महिन्याला येऊन आईची भेट देण्याची ग्वाही दिली आहे. वृद्धांना पैसे, जेवणापेक्षा नात्याची जास्त गरज असते. त्यामुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या नातेवाईकांनी भेटून त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधावा, असे आवाहन मी करतो.
‘लोकमत’मधील छायाचित्रामुळे तब्बल बारा वर्षानंतर संकेश्वरमधील लक्ष्मी आणि निलेश बाबर या माय-लेकराची भेट घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमात घडली.