चोवीस तास पाणी देणारे फसवणुकीचे नऊ हजारांचे ‘मीटर’
By admin | Published: August 13, 2015 11:45 PM2015-08-13T23:45:41+5:302015-08-14T00:07:13+5:30
नवा फंडा : महापालिकेचीच योजना असल्याचे भासवून लूट; नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन
कोल्हापूर : तुमच्या नळाला चोवीस तास पाणी येईल. त्यासाठी आम्ही खास मीटर बसवून देतो. त्यासाठी फक्त नऊ हजार रुपये भरावे लागतील, असे सांगून काही भामटे लोकांची फसवणूक करीत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. गुरुवारी सकाळी पांजरपोळच्या मागील बाजूस असलेल्या केशव स्मृती अपार्टमेंटमध्ये असाच एक भामटा गेला होता; परंतु तेथील सजग नागरिकांमुळे कुणाची फसवणूक झाली नाही.हे भामटे सर्वप्रथम ज्यांच्या घरी जाणार, त्यांच्या घरी अगोदर फोन करतात. महापालिकेतून उपअभियंता कुलकर्णी, गायकवाड बोलतो असे सांगतात व असे मीटर बसवायचे आहे का, म्हणून विचारणा करतात. मुख्यत: अपार्टमेंट, हॉटेल व रुग्णालयात जाऊन हे लोक असे आमिष दाखवितात. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारासही असाच एकजण केशव स्मृती अपार्टमेंटमध्ये गेला. त्याचा गणवेश खाकी होता. हातात महापालिका कर्मचाऱ्याच्या हातात असते तसे बिलिंग बुकही होते. कॅनरा बँकेत नोकरी करणाऱ्या शाल्मली देशपांडे यांच्या घरी जाऊन त्याने हे आमिष दाखविले. तिथे असतानाच त्याला कुणाचा तरी फोन आला व मीटर लगेच बसवून देत असल्याचे त्याने खोटेच सांगितले.
श्रीमती देशपांडे या चौकस असल्याने त्यांना या भामट्याबद्दल शंका आली. वृत्तपत्रांत अशी महापालिकेची कोणतीही योजना असल्याचे आपण वाचलेले नाही; त्यामुळे त्यांचा यावर विश्वास बसला नाही आणि नुसतेच मीटर बसविल्यावर नळाला चोवीस तास पाणी कसे येणार, अशीही शंका त्यांना आली. त्याने अगोदरच देशपांडे यांचा पाण्याच्या मीटरचा नंबर आणला होता. या भागातील महापालिकेच्या मीटर रीडरची बावड्याला बदली झाल्याने मी नवीन आलो आहे, असेही तो सांगत होता. त्यांनी अपार्टमेंटमधील अन्य महिलांना सांगून त्या व्यक्तीची चौकशी सुरू केल्यावर तो तातडीने तेथून पसार झाला.
आमच्याकडेही लोकांच्या तक्रारी : जल अभियंता
अशा पद्धतीने फसवणूक झालेल्या लोकांच्या आमच्याकडेही तक्रारी आल्या असल्याचे महापालिकेचे जल अभियंता मनीष पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ते म्हणाले, ‘आम्ही वृत्तपत्रांत जाहिरात देऊन अशा लोकांपासून सावध राहण्याचे आवाहनही केले आहे.’
गेल्या तीन-चार महिन्यांपासून वेगवेगळ्या भागांतून अशा तक्रारी येत आहेत. मध्यंतरी एकास नागरिकांनी पकडले होते; परंतु ज्यांची फसवणूक झाली होती, त्यांचे त्याने घेतलेले पैसे परत दिल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार देण्यास नकार दिला.
काही दिवसांपूर्वी पाळत ठेवून एका नागरिकास फोन आल्यावर पैसे द्यायची तयारी दाखविली. त्याला विशिष्ट ठिकाणी यायला सांगितल्यावर त्याला संशय आला व तो पैसे न्यायला आलाच नाही, असेही मनीष पवार यांनी सांगितले.