बारावी परीक्षेस यंदा सव्वा लाख विद्यार्थी
By admin | Published: February 19, 2015 12:15 AM2015-02-19T00:15:46+5:302015-02-19T00:21:55+5:30
शनिवारपासून प्रारंभ : भरारी पथकांची राहणार करडी नजर
कोल्हापूर : शासनाच्या नव्या सूचनांनुसार बारावीच्या परीक्षेची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाने तयारी पूर्ण केली आहे. यावर्षी १ लाख २३ हजार ७९३ विद्यार्थी-विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत. शनिवारी (दि. २१) मराठीच्या पेपरने परीक्षेला प्रारंभ होईल. विभागातील १३५ परीक्षा केंद्रे त्यासाठी सज्ज झाली आहेत.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा केंद्रांना जनरेटर अथवा इन्व्हर्टरची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार विभागातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील एकूण १३४ परीक्षा केंद्रांवर जनरेटर अथवा इन्व्हर्टरची व्यवस्था केली आहे. ‘कॉपीमुक्त’ परीक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यात सात भरारी पथके कार्यरत असणार आहेत. कोल्हापूर शहरात
११ परीक्षा केंद्रे आहेत. विभागातून एकूण ३ हजार २२५ हे खासगी विद्यार्थी (१७ क्रमांकाचा अर्ज भरलेले) आणि ६ हजार ८०१ इतके पुनर्परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. दरम्यान, महाविद्यालयांमध्ये
२ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या प्रात्यक्षिक परीक्षा बुधवारी संपल्या. पूर्वतयारी, प्रवेशपत्रांच्या वितरणाची महाविद्यालयांमध्ये लगबग सुरू आहे. तीन दिवसांनी पहिला पेपर असल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनी अभ्यासात गुंतल्या आहेत. (प्रतिनिधी)
परीक्षा केंद्रे अशी...
जिल्हापरीक्षा केंद्रे विद्यार्थी
(हजारांत)
कोल्हापूर५३४२२२६
सांगली४०३६१६१
सातारा४२३८६०५
विद्यार्थी...
शाखा विद्यार्थी
विज्ञान ४८१९६
कला ४३८५०
वाणिज्य २४१५३
एमसीव्हीसी ६२३४
यावर्षी विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वाचन, आकलन करण्यासाठी दिली जाणार आहे. परीक्षेबाबत कोल्हापूर विभागातील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, आदींच्या संघटनांच्या बैठका घेतल्या आहेत. तसेच विजेची आणि पाण्याची व्यवस्था परीक्षा केंद्रांवर केली आहे. - शरद गोसावी, कोल्हापूर विभागीय सचिव,
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ