उपनगरात वाहतुकीचा बोजवारा, अपघातात वीस जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:23 AM2021-03-15T04:23:32+5:302021-03-15T04:23:32+5:30
अमर पाटील : कळंबा दक्षिणच्या उपनगरातील मुख्य रस्त्यावर वारंवार वाहतुकीची कोंडी वाढून अपघातात वाढ होत असेल तर त्या अशा ...
अमर पाटील : कळंबा
दक्षिणच्या उपनगरातील मुख्य रस्त्यावर वारंवार वाहतुकीची कोंडी वाढून अपघातात वाढ होत असेल तर त्या अशा ब्लॅक स्पॉटला पालिका व वाहतूक नियंत्रण विभाग प्रशासनाने भेट देऊन उपाययोजना करणे नागरिकांना अपेक्षित असते. प्रशासनाने प्रामाणिक सर्वेक्षण करून सुधारणा केल्यास वाहतुकीची कोंडी फुटून अपघाताचे प्रमाण कमी होऊन रस्ते प्रवासास सुरक्षित होतील; पण करायचे कोणी हाच कळीचा मुद्दा आहे.
गेल्या पाच वर्षांत वीस जणांचे जीव नाहक गेले तर शेकडो अपघातात कायमचे जायबंदी झाले.
उपनगरातील क्रेशेर चौक, संभाजीनगर चौक, हॉकी स्टेडियम चौक, साई मंदिर चौक कळंबा, नवीन वाशी नाका चौक, फुलेवाडी जकात नाका चौक, जवाहरनगर चौक, निर्माण चौक, साळोखेनगर खाऊगल्ली चौक, तांबट कमान चौक, कळंबा घोटने मळा हे वाहतुकीच्या बोजवारा उडालेले एकंदरीत आकरा ब्लॅक स्पॉट. विशेष म्हणजे यातील बहुतांश ठिकाणी सिग्नल व्यवस्था कार्यान्वित असून वाहतूक नियंत्रक पोलीस मोठ्या आभावानेच कारवाई करताना सर्वसामान्य जनतेला दिसून येतात.
रस्त्यावर कसेही उभे भाजीपाला फळे विक्रेते, बेशिस्त पार्क केलेल्या गाड्या, अतिक्रमणात हरवलेली सिग्नल व्यवस्था, पदपथावरील विक्रेते व खाऊगल्ल्या हे या चौकातील रस्त्याचे वैशिष्ट्य.
उपनगरात अतिक्रमण हटवण्यात पालिकेचे नियोजन शून्य आहे. अतिक्रमणात हरवलेले रस्ते पाहता निव्वळ कधी तरी प्रसिद्धी पुरती मोहीम राबविण्यात हा विभाग पटाईत असल्याचे स्पष्ट आहे. क्रशर चौक, संभाजीनगर चौक, फुलेवाडी जकात नाका चौक अनुक्रमे गारगोटी, राधानगरी, गगनबावडा वडापधारक आपेरिक्षा जीप खाजगी प्रवासी वाहनांच्या कोंडीत अडकलेला असतो.
याखेरीज रस्त्यालगतची हॉटेल्स, मंगल कार्यालये, शाळा, खाजगी क्लासेस, बार, वाहतूक कोंडीत भर घालतात. उपनगरातील वाहतूककोंडीचे हेच ब्लॅक स्पॉट नागरिकांच्या जिवावर बेतत असून यावर संबंधित प्रशासनाने तात्काळ कारवाई करणे क्रमप्राप्तच आहे.
ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणच्या समस्या १) पदपथाऐवजी पादचाऱ्यांकडून रस्त्याचा वापर. २) वाहतूककोंडीने रस्त्यावर अपघातात, वादावादीत वाढ. ३) बंद पथदिवे अपघातास निमंत्रण. ४) गतिरोधकाअभावी वेगमर्यादा व यू टर्नमध्ये वाढ. ५) अतिक्रमणामुळे वाहतुकीसाठी एकपदरी रस्ता शिल्लक. ६) रस्त्याकडेस अस्ताव्यस्त लावलेल्या गाड्या.
ब्लॅक स्पॉट चौकांवर उपाययोजना १) राजकीय हस्तक्षेप टाळत अतिक्रमण कारवाईत सातत्य. २) आयआरसी नियमानुसार गतिरोधक बसवावेत. ३) उदंड झालेल्या सिग्नलवर वाहतूक नियंत्रक पोलीस संख्या वाढवावी. ४) वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईची गरज. ५) विविध कार्यालये, अपार्टमेंट, शाळा, हॉटेल्स, बार यांनी स्वतःची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था उभारावी.
प्रतिक्रिया
श्रद्धा महागावकर नागरिक जीवबानाना पार्क
उपनगरातील चौक अपघातप्रवण बनत असून बेशिस्त पार्किंगवर कारवाई करत अतिक्रमण हटाव मोहिमेत सातत्य ठेवत रस्ते मोकळे न केल्यास वाहतुकीचा प्रश्न जटिल बनण्याची शक्यता आहे.
चौकट
वीस मृत्यू, शेकडो जायबंदी
गेल्या पाच वर्षांत राजलक्ष्मीनगर चौकात, रिंगरोड फुलेवाडी जकात नाका, सायबर चौक, क्रशर चौक, निर्माण चौकात प्रत्येकी दोन साई मंदिर चौक कळंबा चार, तर कळंबा घोटने मळा येथे सहा, असे वीस जण विविध अपघातांत मृत्यू झाले तर शेकडो जायबंदी झाले.