माणगाव येथे तीन दिवसात कोरोनाचे सत्तावीस रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:31 AM2021-06-09T04:31:54+5:302021-06-09T04:31:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रुकडी माणगाव : माणगाव येथे तीन दिवसात कोरोनाचे सत्तावीस रूग्ण आढळल्याने माणगाव पुन्हा ‘डेंजर झोन’मध्ये येत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रुकडी माणगाव : माणगाव येथे तीन दिवसात कोरोनाचे सत्तावीस रूग्ण आढळल्याने माणगाव पुन्हा ‘डेंजर झोन’मध्ये येत आहे. बाधितांची रूग्णसंख्या वाढत असल्याने माणगाव पॅटर्नच्या अडचणी वाढत असून, पाच कुटुंबांमध्येच बावीस रूग्ण असल्याने माणगाव येथील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३६ झाली आहे.
माणगाव येथे मेच्या सुरूवातीला कोरोना रूग्ण झपाट्याने वाढले होते. यावर ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ युद्धपातळीवर निर्णय घेत गाव बंद तसेच कोरोनाबाधित रुग्ण असणारे प्रभाग बंद करत संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे येथील रूग्णसंख्या घटली होती.
दरम्यान, कोरोनाबाधित रूग्णांपैकी दूध संस्थेतील एक सेवक व त्याचे कुटुंब बाधित झाल्याने ग्रामस्थांची धास्ती वाढली आहे. ग्रामपंचायत प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, ग्रामस्थ योग्य ती खबरदारी घेत नसल्याने दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत आहे. गावात १४६ बाधित रुग्णांपैकी पाच रूग्ण मयत तर १०५ बरे झाले असून, ३६ रूग्ण नव्याने बाधित आढळले आहेत.