सत्तावीस प्राथमिक शाळा ‘अनधिकृत’
By Admin | Published: June 10, 2015 12:49 AM2015-06-10T00:49:42+5:302015-06-10T00:53:12+5:30
शिक्षण विभागाकडून यादी जाहीर : प्रवेश न घेण्याचे आवाहन; बंद करा, अन्यथा कारवाईचा इशारा
कोल्हापूर : जिल्ह्यातील तब्बल २७ प्राथमिक शाळा अनधिकृत असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने मंगळवारी प्रसिद्धिपत्रकातून जाहीर केले. या शाळांनी शासनाकडून परवानगी घेतलेली नाही. ‘अधिकृत’मध्ये सर्वाधिक इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. संबंधित शाळेत पालकांनी पाल्याचा प्रवेश करू नये, असे आवाहन केले आहे. अनधिकृत शाळा बंद कराव्यात, अन्यथा कारवाई करणार, असेही म्हटले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात अनधिकृत शाळांचे पीक वाढले आहे. प्रत्यक्षात कारवाई केली जात नाही; त्यामुळे दिवसेंदिवस अनधिकृत शाळांची संख्या वाढत आहे. इंग्रजी शाळांकडे पालकांचा कल अधिक आहे. त्यामुळे इंग्रजी शाळा काढून पैसे कमविण्यासाठी राजकीय वरदहस्त असलेले अनेकजण सक्रिय आहेत. ‘बंद’ची कारवाई झाल्यास येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
अनधिकृत तालुकानिहाय शाळा अशा : गीताई इंग्लिश मीडियम स्कूल (सातवे, ता. पन्हाळा), डॉ. अमोल अनाथ मुलामुलींची निवासी मराठी शाळा (सोनवडे, ता. शाहूवाडी), कोरगांवकर इंग्लिश मीडियम स्कूल (सदर बाजार, कोल्हापूर), ज्ञानहो विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, (नाना पाटीलनगर, कोल्हापूर), आनंद इंग्लिश मीडियम स्कूल, नाना पाटीलनगर (कोल्हापूर), चाटे इंग्लिश मीडियम स्कूल (शुगर मिल, कसबा बावडा), दत्ताबाळ इंग्लिश मीडियम स्कूल, कसबा बावडा, स्वामी विवेकानंद विद्यालय (तळंदगे, ता. हातकणंगले), सोनाली पब्लिक स्कूल (हातकणंगले), इंदिरा गांधी बालविकास मंदिर (हिंगणागाव, ता. हातकणंगले), सिल्म इंग्लिश मीडियम स्कूल (हुपरी, ता. हातकणंगले), यश सेमी-इंग्रजी स्कूल (वडगाव, ता. हातकणंगले), श्री. पंडितराव खोपकर इंग्लिश मीडियम स्कूल (सावरवाडी, ता. करवीर), ख्रिस्तोफर जोसेफ जॉन्सन यांच्या गायडिस्ट शिक्षण संस्थेची वाघजाई ग्रीन व्हील्स इंग्रजी स्कूल (कोपार्डे, ता. करवीर), जीवनदीप एन्टायर अॅण्ड सेमी-इंग्रजी मीडियम स्कूल (कोपार्डे फाटा, ता. करवीर), बळवंतराव कोरे इंग्लिश मीडियम स्कूल (गडमुडशिंगी, ता. करवीर), विद्याभवन इंग्लिश मीडियम स्कूल (उजळाईवाडी, ता. करवीर), गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, (गडमुडशिंगी ता. करवीर), ज्ञानकला विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल (उचगाव, ता. करवीर), ओमसाई निवासी शाळा (पीरवाडी, ता. करवीर), मालू इंग्लिश मीडियम स्कूल (जयसिंगपूर, ता. शिरोळ), दत्त प्राथमिक विद्यामंदिर (मराठी) (नृसिंहवाडी, ता. शिरोळ), दत्त बालक मंदिर - मराठी (शिरोळ), आर्मी पब्लिक स्कूल (शिरोळ), जान्हवी इंग्लिश मीडियम स्कूल (गणेशवाडी, ता. शिरोळ), आर्मी पब्लिक स्कूल (कवठेगुलंद, ता. शिरोळ), फाउंडेशन (कवठेगुलंद, ता. शिरोळ).
कारवाई होणार
अनधिकृत म्हणून जाहीर केलेल्यांत शिरोळ तालुक्यातील सात, करवीरमधील आठ, कोल्हापूर शहरातील पाच आणि हातकणंगलेमधील पाच शाळा आहेत. शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांतील प्रत्येकी एक शाळा आहे. अनधिकृत शाळा संबंधित चालकांनी बंद कराव्यात, अन्यथा ‘बालकांचे मोफत आणि हक्काचे शिक्षण कायद्यां’तर्गत कारवाई करण्यात येणार आहे.