वीस सायझिंग कारखाने सुरू
By admin | Published: September 11, 2015 01:03 AM2015-09-11T01:03:06+5:302015-09-11T01:03:06+5:30
किमान वेतनासाठी यशस्वी चर्चा : पुढील आठवड्यात वस्त्रनगरी पूर्वपदावर येणे शक्य
इचलकरंजी : सायझिंग कामगारांचा संप मागे घेण्याची अधिकृत घोषणा झाली नसली, तरी शहर व परिसरातील सुमारे वीस सायझिंग कारखाने सुरू झाले आहेत, तर ५० कारखान्यांवर सायझिंगधारक व कामगारांमधील चर्चा यशस्वी झाली असल्याचे सांगण्यात आले. साधारणत: पुढील आठवड्यात कारखाने सुरू होऊन येथील वस्त्रोद्योग पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी शासनाने जाहीर केलेल्या किमान वेतनाची अंमलबजावणी ताबडतोब करण्यात यावी, या मागणीसाठी गेले ५१ दिवस सायझिंग-वार्पिंग कामगारांचा संप सुरू आहे. संपामुळे शहरातील वस्त्रोद्योगाची घडी विस्कळीत झाली होती. मात्र, यंत्रमाग उद्योगात कमालीची मंदी असल्यामुळे त्याची तीव्रता सुरुवातीच्या काळात भासली नाही. मात्र, संप लांबल्यामुळे वस्त्रनगरीमध्ये अस्वस्थता पसरली होती.
इचलकरंजी, कोल्हापूर व मुंबई मंत्रालय अशा स्तरावर बैठका होऊनसुद्धा किमान वेतनाचा प्रश्न मार्गी लावला नव्हता. त्याचबरोबर पॉवरलूम असोसिएशन व सायझिंग असोसिएशन यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी न्यायालयाने किमान वेतनाच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती दिली नसल्याने संप लांबत चालला होता. शनिवारी (५ सप्टेंबर) जिल्हाधिकारी अमित सैनी व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ५०० रुपये किमान वेतनवाढीचा तोडगा देऊन कारखाने सुरू करण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यासही यश आले नाही.
अखेर मंगळवारी खासदार राजू शेट्टी व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी कामगार नेते ए. बी. पाटील यांच्याशी चर्चा केली. या चर्चेमध्ये कारखाना स्तरावर ५०० रुपयांहून अधिक वाढ देणारे सायझिंग कारखाने सुरू करण्याची मुभा त्यांनी दिली. त्याप्रमाणे गेल्या दोन-तीन दिवसांत चर्चा होऊन सुमारे वीस कारखाने सुरू झाले. त्याचबरोबर बुधवारी व गुरुवारी सुमारे ६० ते ७० सायझिंग कारखान्यांवर चर्चा होऊन हे कारखाने नजीकच्या दोन-तीन दिवसांत सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गेला दीड महिना धूळखात पडलेली सायझिंगची यंत्रसामग्री साफसफाई करण्यासाठी आणखी तीन-चार दिवस लागतील. उर्वरित कारखान्यांवरसुद्धा चर्चेने हा प्रश्न मार्गी लागणार असल्याची चिन्हे असल्याने साधारणत: मंगळवार (१५ सप्टेंबर)नंतर कारखाने पूर्णपणे सुरू होऊन त्यानंतर वस्त्रनगरी पूर्वपदावर येईल.