जिल्ह्यातील वीस हजार कर्मचारी शुक्रवारी संपावर
By admin | Published: August 28, 2016 12:39 AM2016-08-28T00:39:35+5:302016-08-28T00:39:35+5:30
राज्य सरचिटणीस अनिल लवेकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
कोल्हापूर : देशस्तरावरील कामगार-कर्मचाऱ्यांच्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर महागाई व बेरोजगारीला आळा घाला; कंत्राटीकरण, खासगीकरण रद्द करा, आयकर गणनेसाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवा, वेतन पुनर्रचनेसाठी केंद्र सरकारने राज्यांना आर्थिक मदत द्यावी, यासाठी देशातील ११ केंद्रीय कामगार संघटनांनी शुक्रवारी (दि. २) देशव्यापी लाक्षणिक संप पुकारला आहे. यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्णातील २० हजारांहून अधिक सरकारी कर्मचारी सहभागी होतील, अशी माहिती राज्य सरचिटणीस अनिल लवेकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
लवेकर म्हणाले, सरकारी कर्मचाऱ्यांसह कामगारांच्या १२ मागण्यांसाठी ११ केंद्रीय कामगार संघटनांनी शुक्रवारी (दि. २) देशव्यापी लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्णातील २० हजारांहून अधिक वर्ग ३ व ४ चे सरकारी कर्मचारी जिल्हाव्यापी संपात सहभागी होणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय, कृषी विभाग, शिक्षण विभाग, आय.टी.आय., शासकीय तंत्रनिकेतन, गव्हर्न्मेंंट प्रेस, आदी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.
शुक्रवारी सकाळी १० वाजता टाऊन हॉल उद्यान येथे सर्व कर्मचारी एकवटणार आहेत. या ठिकाणी बैठक होऊन संघटनांच्या प्रतिनिधींचे मार्गदर्शन होणार आहे. यानंतर दुपारी एक वाजता कर्मचाऱ्यांच्या रॅलीला सुरुवात होणार आहे. दसरा चौक, सुभाष रोड, उमा टॉकीज, बिंदू चौक, शिवाजी पुतळा, महानगरपालिका या मार्गांवरून येऊन टाऊन हॉल उद्यान येथे रॅलीचा समारोप होईल.
जिल्हाध्यक्ष वसंत डावरे, संजय क्षीरसागर, प्रकाश शेलार, सतीश ढेकळे, नितीन कांबळे, के. एम. बागवान, उत्तम पाटील, बी. एस. खोत, हाश्मत हावेरी, शुभांगी फुटाणे, अंजली देवरकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)