रिक्षात बसताच मोजावे लागणार बावीस रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:25 AM2021-04-08T04:25:06+5:302021-04-08T04:25:06+5:30
कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन प्राधिकरणने पेट्रोल, डिझेल दरवाढ व रिक्षाचालकांच्या मागणीचा विचार करून नव्या भाडेवाढीस मंजुरी दिली आहे. त्यानुसार ...
कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन प्राधिकरणने पेट्रोल, डिझेल दरवाढ व रिक्षाचालकांच्या मागणीचा विचार करून नव्या भाडेवाढीस मंजुरी दिली आहे. त्यानुसार २० ऐवजी २२ रुपये पहिल्या स्टेजला म्हणजेच रिक्षात बसताच २२ रुपये प्रवाशांना मोजावे लागणार आहेत. या नव्या दरवाढीची अंमलबजावणी १ मे २०२१ पासून केली जाणार आहे.
याबाबत प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व प्रादेशिक परिवहन अधिकारी डाॅ. स्टिव्हन अल्वारीस यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत सर्व बाबींचा विचार करून हकीम समितीच्या शिफारशीनुसार वाहनाची किंमत, घसारा, कर, विमा, दुरुस्ती, देखभाल खर्च, महागाई निर्देशांक, इंधन खर्च या सर्व बाबींचा विचार करून रिक्षाचे सुरुवातीचे किमान भाडे २० वरून २२ व पुढील प्रति किलोमीटरचे भाडे १७ वरून १८ रुपये, अशी भाडेवाढ करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी दिली.
नवीन दर लागू करण्यासाठी मीटर कॅलिब्रेशन करून घेणे गरजेचे आहे. मीटर कॅलिब्रेशन करण्यासाठी १८० दिवसांची म्हणजेच दि. ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदत देण्यात येत आहे. मीटर कॅलिब्रेशन केलेल्या ऑटोरिक्षा धारकांसाठी नवीन दर १ मे २०२१ पासून लागू होतील. रात्री १२ ते पहाटे पाच वाजेपर्यंत दीडपट भाडे आकारण्यात येईल. या नियमांचे रिक्षाचालकांनी काटेकोर पालन करावे, असेही प्राधिकरणातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.