वीस पशुवैद्यकीय दवाखान्यांचे रूप पालटणार
By Admin | Published: December 27, 2016 11:56 PM2016-12-27T23:56:10+5:302016-12-27T23:56:10+5:30
आयएसओ मानांकनासाठी तयारी सुरु : दवाखान्यांबद्दल शेतकऱ्यांमध्ये चांगली प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न
आयुब मुल्ला-- खोची कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखालील जिल्ह्यातील वीस पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ मानांकित व्हावीत यासाठी प्रयत्न
सुरु केले आहेत. प्राथमिक टप्प्यात या दवाखान्यांचे रजिस्ट्रेशन डिसेंबरअखेर करण्यात येणार आहे.
राज्यात नागपूर जिल्ह्यात फक्त दोन दवाखाने आयएसओ मानांकित ठरले आहेत. त्यानंतर सर्वांत जास्त मानांकित होण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेने प्रयत्न सुरु ठेवले आहेत.
या वीस दवाखान्यांना मानांकन मिळविण्यासाठी ज्या गोष्टी करणे गरजेच्या आहेत त्या एका एजन्सीच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. याकरिता क्लस्टर पद्धतीने प्रशिक्षण देण्यासाठी चार, तर वैयक्तिक पद्धतीच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येक दवाखान्याला बारा हजार रुपयांची फी आहे. हे प्रशिक्षण डिसेंबरअखेर पूर्ण होईल. मार्च २०१७ पर्यंत सर्व आवश्यक सोयीसुविधा तसेच अद्ययावत माहितींची पूर्तता झाल्यानंतर या दवाखान्यांची तपासणी होईल. त्यानंतर अधिकृत आयएसओप्राप्त म्हणून मानांकनाची घोषणा होईल.
पशुवैद्यकीय सेवेतून ग्रामसमृद्धी योजना सन २००८-०९ पासून सुरु आहे. त्यातीलच हा एक दर्जा उंचावण्याचा उपक्रम आहे. या उपक्रमामुळे दवाखाना परिसराची स्वच्छता, अद्ययावत माहितीनुसार संपूर्ण रेकॉर्ड सज्ज, शासनाच्या विविध योजनांची तत्काळ अंमलबजावणी, औषधांची उपलब्धता यासह सर्व प्राथमिक सुविधांची पूर्तता होणार आहे.
सध्या जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखान्यांची अवस्था सोयी सेवा संदर्भात उत्तम आहे, असे म्हणता येत नाही. गैरसोयीबरोबरच वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदेही रिक्त आहेत. त्यामुळे ही सेवा विस्कळीत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक दवाखान्याला किमान वीस हजारांचा निधी देण्याची व्यवस्था पशुसंवर्धन विभागाने केली आहे.
स्थानिक पातळीवर लोकवर्गणीची मदत यासाठी घेतली जाणार आहे. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी करून दवाखान्यांबद्दल शेतकऱ्यांमध्ये किंवा पशुपालन करणाऱ्यांमध्ये चांगली प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न आहे. त्यास यश मिळाल्यानंतर उर्वरित टप्प्यात टप्प्याटप्प्याने दवाखान्यांचा समावेश करण्यात येणार आहे.
येत्या चार दिवसांत रजिस्ट्रेशन
निमशिरगाव, शिरोळ, बिद्री, शाहूवाडी, शित्तूर ऊर्फ वारुण, परळे निनाई, कौलगे, हरळी, नूल, कळे, कसबा ठाणे, राशिवडे, धामोड, साळवण, मडूर, मुरुकटे, तांबाळे, मडिलगे, भादवण, वाटंगी, चंदगड, हळकर्णी, दाटे, कानूर बुद्रुक, वाशी, वडणगे, सडोली खालसा, सांगवडे, बोलोली, भुयेवाडी, कसबा बीड, इस्पूर्ली यातील वीस दवाखाने जे सक्षमपणे तयार होतील त्यांची परिस्थिती पाहूनच यापैकी वीस दवाखान्यांचे प्राथमिक टप्प्यात रजिस्ट्रेशन येत्या चार दिवसांत करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात एकूण १३७ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यापैकी ८० ग्रेडवनचे तर ५७ ग्रेड टूचे दवाखाने आहेत. यातून जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. आयएसओ मानांकनामुळे निश्चितपणे प्रेरणा मिळेल. सर्वच ठिकाणी दर्जेदार सेवा, सुविधा उपलब्ध होतील.
- संजय शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,
जिल्हा परिषद, कोल्हापूर