वसंत मुळीक यांचा तेवीस वर्षे लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:38 AM2018-11-30T00:38:09+5:302018-11-30T00:38:13+5:30
कोल्हापूर : ज्या काळात मराठा समाजाच्या प्रश्नांबद्दल फारशी जागृती नव्हती तेव्हापासून या समाजासाठी निष्ठेने झगडणाऱ्या वसंत मुळीक यांचा आरक्षणाचा ...
कोल्हापूर : ज्या काळात मराठा समाजाच्या प्रश्नांबद्दल फारशी जागृती नव्हती तेव्हापासून या समाजासाठी निष्ठेने झगडणाऱ्या वसंत मुळीक यांचा आरक्षणाचा निर्णय झाल्यावर आनंदाने ऊर भरून आला. गेली २३ वर्षे ते मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी आंदोलनाच्या माध्यमातून सक्रिय आहेत.
कॉलेज जीवन संपल्यावर एकदा आण्णासाहेब पाटील यांच्या मराठा लाख मेळाव्यास उपस्थित राहण्याची संधी त्यांना मिळाली. त्यातून भारावून जाऊन त्यांनी मराठा समाजासाठी काम करण्याचे ठरविले. पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून त्यांनी एमएसईबीमध्ये नोकरी केली; परंतु हे करतच अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्ह्यात २५० गावांत शाखा सुरू केल्या. वधूवर मेळावे, गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप यांतून सुरू झालेले काम मराठा आरक्षणाच्या चळवळीपर्यंत आले. या कामात त्यांना वसंतराव घाटगे, चंद्रकांत चव्हाण, प्रकाश पाटील, कसबा बावडा येथील बी. जी. पाटील, शंकरराव शेळके यांचे सहकार्य लाभले.
कोल्हापूर जिल्ह्यात अलीकडील काही वर्षांत मराठा महासंघ म्हटले की, वसंत मुळीक हा त्याला समानार्थी शब्द झाला होता. इतके ते या कामाशी एकरूप झाले होते. मुळात स्वभाव मनमिळावू व सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती यामुळे ते मराठा आरक्षणाच्या चळवळीतही सेतू म्हणून काम करू शकले. या कामात त्यांना तरुण इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा मोठा आधार राहिला. मराठा समाज समुद्रासारखा आहे. त्याचे संघटन करणे खूप अवघड होते. आम्ही मेळावा घेतला तर एकेकाळी ५ माणसेही जमत नव्हती; परंतु तेच आरक्षणाच्या मोर्चावेळी मात्र लाखोंने लोक रस्त्यावर आले. आरक्षणाबरोबरच या समाजातील चुकीच्या चालीरीती याबाबत प्रबोधन करणार असल्याचे ते म्हणाले.