दोन वेळा धनादेश काढूनही दिले नाहीत, कनिष्ठ लिपिकाचा निष्काळजीपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 11:55 AM2019-11-16T11:55:50+5:302019-11-16T11:57:03+5:30
दोन वेळा धनादेश काढूनही कुष्ठरुग्णांसाठी स्वयंपाक बनविणाऱ्या महिलांना ते न देणारे कनिष्ठ लिपिक बाबूराव कात्रे यांनी निष्काळजीपणा दाखविल्याचा ठपका चौकशीमध्ये ठेवण्यात आला आहे. याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला असून, आज, शनिवारी त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात येणार आहे.
कोल्हापूर : दोन वेळा धनादेश काढूनही कुष्ठरुग्णांसाठी स्वयंपाक बनविणाऱ्या महिलांना ते न देणारे कनिष्ठ लिपिक बाबूराव कात्रे यांनी निष्काळजीपणा दाखविल्याचा ठपका चौकशीमध्ये ठेवण्यात आला आहे. याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला असून, आज, शनिवारी त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात येणार आहे.
शेंडा पार्क येथील कुष्ठरुग्णांसाठी दोन महिला स्वयंपाक बनवितात. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीतील म्हणजेच वर्षभराचे त्यांचे मानधन अदा करण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांनी गेल्या १० दिवसांपासून स्वयंपाक करणे बंद केल्याने कुष्ठरुग्णांनाच चुलीवर भात-आमटी बनवावी लागत होती. याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर आरोग्य विभागाला जाग आली. माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. फारूक देसाई यांना या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
त्यानुसार डॉ. देसाई यांनी गुरुवारी दिवसभर चौकशी करून शुक्रवारी अहवाल जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे यांना सादर केला. ३० मार्च २०१९ रोजी मानधनाचा धनादेश काढला होता; परंतु कात्रे यांनी तो संबंधित महिलांना दिलाच नाही आणि तो मुदतबाह्यही झाला. त्यामुळे पुन्हा ९ आॅगस्ट २०१९ रोजी धनादेश काढण्यात आला. तोही त्यांनी दिला नाही. वर्षभराचे मानधन थकल्याने अखेर या महिलांनी स्वयंपाक करणे बंद केले होते. अखेर गुरुवारी (दि. १४) ८४ हजार रुपयांचा धनादेश दिल्यानंतर या महिला पुन्हा कामावर रुजू झाल्या.
कात्रे यांच्यावर होणार कारवाई
कात्रे यांनी कामाकडे दुर्लक्ष, हलगर्जीपणा आणि टाळाटाळ केल्याने कुष्ठरुग्णांची आहार सेवा विस्कळीत होऊन आरोग्य खात्याची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका अहवालामध्ये कात्रे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस काढण्यात येणार असून ती आज, शनिवारी निघेल.