कोल्हापूरजवळ दोन अपघात : एक ठार, १७ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:04 PM2018-07-12T12:04:24+5:302018-07-12T12:43:21+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार आणि १२ जण जखमी झाले. हे अपघात गुरुवारी पहाटे झाले.
कुरुंदवाड/कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार आणि १७ जण जखमी झाले. हे अपघात गुरुवारी पहाटे झाले.
कुरुंदवाड-भैरववाडी-नांदणी मार्गावर गणेश बेकरीच्या कामगारांना घेवुन नांदणीच्या दिशेने जाणारी बस उलटून एका कामगाराचा मृत्यू झाला. काशीनाथ शशिकांत बेरड (वय २८ रा. नवे दानवाड) असे त्याचे नाव आहे. बसमध्ये एकुन ४0 कामगार प्रवास करत होते. या कामगारापैकी १५ महिला जखमी झाल्याआहेत. गुरुवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
सूरज लकडे यांची ही बस असून त्यांनी ही बस (एम. एच. 0९ सी. व्ही 0७१८) गणेश बेकरीच्या कामगारांना ने-आण करण्यासाठी भाड्याने दिली होती. गुरुवारी सकाळी सहा वाजता ते दानवाड, टाकळी, राजापुर, कुरुंदवाड या भागातील बेकरी कामगारांना घेऊन कुरुंदवाड येथून निघाली होती. बसमध्ये एकूण ४० कामगार होते. सर्व जण गणेश बेकरीत कामाला जात होते.
बेकरीत वेळेत पोहोचावयाचे असल्याने चालक दत्ता बले (रा. नांदणी) हा बस भरधाव वेगाने हाकत होता. कुरुंदवाडीपासून ५ किलोमीटर अंतरावर असलेला अरुंद पुल ओलांडताना त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कुरुंदवाड-नांदणी रस्त्यालगतच्या टोपले-पाटील यांच्या शेतात बस घुसली आणि उलटली.
या अपघातात चालकाच्या शेजारी बसलेल्या काशीनाथ बेरड या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील १५ महिला जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
दुसऱ्या अपघातात कोल्हापूरकडे येणाऱ्या शिवशाही बसने दुभाजक ओलांडून कोल्हापूरहून सांगलीकडे जाणाऱ्या एसटी.बसला हातकणंगले तालुक्यातील चोकाक येथे धडक दिली. या अपघातात वाहकासह दोघेजण किरकोळ जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे. सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी हा अपघात झाला.
कोल्हापूरकडे येणाऱ्या शिवशाही बसने हातकणंगले तालुक्यातील चोकाक बसस्थानकाजवळ दुभाजक ओलांडून कोल्हापूरहून सांगलीकडे जाणाऱ्या एस.टी.ला धडक दिली. या अपघातात एसटी बसच्या वाहकासह दोघेजण किरकोळ जखमी झाले.
या अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. एसटी बस रस्त्यातून बाजूला घेतली असून शिवशाही बस क्रेनच्या सहाय्याने बाजूला घेण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील ठप्प झालेली वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे.