Kolhapur: शिवाजी विद्यापीठात मोडी लिपीचा खजिना, अडीच लाख कागदपत्रांचे जतन

By पोपट केशव पवार | Published: August 8, 2024 04:07 PM2024-08-08T16:07:30+5:302024-08-08T16:07:49+5:30

कागदपत्रांचे डिजिटायझेशन : इतिहास संशोधनाला मिळतेय चालना

Two and a half lakh documents of Modi script preserved in Shivaji University Kolhapur | Kolhapur: शिवाजी विद्यापीठात मोडी लिपीचा खजिना, अडीच लाख कागदपत्रांचे जतन

Kolhapur: शिवाजी विद्यापीठात मोडी लिपीचा खजिना, अडीच लाख कागदपत्रांचे जतन

पोपट पवार

कोल्हापूर : शिवपूर्वकाळ ते स्वातंत्र्यकाळापर्यंत प्रशासनाची दैनंदिन कामकाजासाठीची मुख्य लिपी ही मोडीच होती. त्यामुळे या काळातला इतिहास या मोडी लिपीतच दडला आहे. तो अभ्यासायचा असेल तर मोडी लिपीचे ज्ञान अन् या लिपीतील कागदपत्रे गरजेची आहेत.

अलीकडच्या काळात ही कागदपत्रे अत्यंत दुर्मीळ होत असताना शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्रात मात्र तब्बत अडीच लाख मोडी लिपीतील कागदपत्रांचा खजिनाच उपलब्ध आहे. ज्याला इतिहासात जाऊन संशोधन करायचे आहे अशांसाठी हा दस्ताऐवज लाखमोलाचा आहे. विशेष म्हणजे या सर्व कागदपत्रांचे डिजिटायझेशन करण्यात आले असून ही लाखमोलाची कागदपत्रे इतिहास संशोधनाला चालना देणारी ठरत आहेत.

शिवपूर्वकाळापासून ते स्वातंत्र्यकाळापर्यंत प्रशासनाची तसेच दैनंदिन कामकाजासाठी मराठी भाषेबरोबरच मोडी लिपी मुख्यलिपी होती. त्यामुळे या काळातील सगळा इतिहास या मोडी लिपीतच उपलब्ध आहे. छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्राकडे शिर्के दप्तर, नाना फडणवीस दप्तर, भगवानदास घारगे, ढेरगे दप्तर, महाजन दप्तर, पिसाळ दप्तर, नाईक दप्तर, जयरामस्वामी दप्तर, पारसनीस दप्तर व अकोलकर दप्तर या दहा विविध कालखंडाचा इतिहास सांगणारी मोडी लिपीतील अडीच लाख कागदपत्रे उपलब्ध आहेत. ही सर्व कागदपत्रे या केंद्राने सीडीच्या रूपात डिजिटायझेशन केली आहेत. इतिहासातील कोणताही संदर्भ या कागदपत्रांच्या माध्यमातून पटकन मिळत असल्याने इतिहास जाणू इच्छिणाऱ्यांना, त्यावर संशोधन करणाऱ्यांसाठी हा खजिना उपयुक्त ठरत आहे.

शंभराहून अधिक जणांनी केला मोडीचा अभ्यास

इतिहास अधिविभागाअंतर्गत छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन
अध्यासन केंद्रात २०२० पासून मोडी लिपीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. चार वर्षांत तब्बल शंभराहून अधिक जणांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. सहा महिन्यांचा हा अभ्यासक्रम असून प्रवेशित विद्यार्थ्यांना मोडी लिपीचे तज्ज्ञ मार्गदर्शन करतात. विशेष म्हणजे कुणबी प्रमाणपत्राचा विषय प्रचंड चर्चेत असताना जिल्हा प्रशासनाने कागदपत्रांवरील मोडी लिपी ओळखण्यासाठी येथील विद्यार्थ्यांची मागणी केली होती.

मोडी लिपी येणे का गरजेचे

बाराव्या शतकापासून मोडी लिपी प्रचलित आहे. शेतीसंबंधीच्या नोंदी, जन्म-मृत्यू नोंदी, खरेदी पत्रे, न्यायालयीन दावे यासंबंधीची सर्व कागदपत्रे ही मोडी लिपीतच आहेत. मात्र, मोडी लिपी येत नसल्याने अनेकांना जुन्या कागदपत्रांवर नेमके काय लिहिले आहे हे कळत नाही. जर मोडी लिपी वाचता आली तर अनेक गूढ माहिती समोर येऊ शकते.

इतिहास काळातील कोणत्याही विषयावर संशोधन करायचे असेल तर मोडी लिपी अवगत असणे गरजेचे आहे. जुन्या काळातील शेतीसंबंधीच्या नोंदी, जन्म-मृत्यू नोंदी, खरेदी पत्रे, न्यायालयीन दावे यासंबंधीची सर्व कागदपत्रे ही मोडी लिपीतच उपलब्ध आहेत. त्यामुळे मोडी लिपीचे ज्ञान अवगत करण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मोडी लिपीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा. -डॉ. अवनीश पाटील, इतिहास अधिविभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ.

Web Title: Two and a half lakh documents of Modi script preserved in Shivaji University Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.