वडिलांनी पगार दिला नाही म्हणून अडीच वर्षाच्या चिमुरडीची हत्या; कोल्हापुरातील हादरवणारी घटना
By सचिन भोसले | Published: May 20, 2023 12:03 PM2023-05-20T12:03:37+5:302023-05-20T12:05:22+5:30
रंकाळा तलावासमोरील एका माॅलमागील शेतातील घटना : संशयितास अटक
कोल्हापूर : वीटभट्टीवर मालकाने पगार दिला नाही. याला वडील कारणीभूत असल्याच्या कारणावरून अडीच वर्षांच्या बालिकेचे भवानी मंडपातून अपहरण करून रंकाळा परिसरातील एका मॉलमागील शेतवाडीतील सिमेंटच्या टाकीत टाकून बालिकेला जिवे मारले. याबद्दल फिरस्ता रांजू विश्वजित मंडल ऊर्फ राजू बिहारी (कोल्हापूर, मूळ रा. बिबीघाट, नथपाडा ता. समुत्रा,जि. वर्धमान, पश्चिम बंगाल) या संशयितास जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. अशी माहिती पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांनी शुक्रवारी दिली.
पोलिसांनी सांगितले की, गणेश भाऊसाहेब गटे व त्यांची पत्नी पूजा गटे (मूळ रा. लोणी, ता. राहता, जिल्हा अहमदनगर) यांची अडीच वर्षांची मुलगी कार्तिकी व एक वर्षाचा मुलगा असे वीटभट्टीचे कामासाठी बालिंगा पाडळी, ता. करवीर येथे आले आहेत. तेथील काम संपत आल्यामुळे ते गुरुवारी दुपारी १२ वाजता भवानी मंडपात आले होते. तेथे थांबले असता मुलगी कार्तिकी खेळत असताना ती कोठेतरी हरविली. याबाबतची तक्रार वडील गणेश गटे यांनी जुना राजवाडा पोलिसांत दिली. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.
नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नाही; सरकार असं चालतं का?, राज ठाकरेंचा सवाल
त्यात कार्तिकीला ओळखीचा संशयित राजू बिहारी कार्तिकीला घेऊन जात असल्याचे दिसून आले. गटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित बिहारीच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोधासाठी उपनिरीक्षक संदीप जाधव, प्रीतमकुमार पुजारी, अभिजित इंगळे व अंमलदार यांच्या तपास पथके तयार करून मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन, मोकळी मैदाने, रंकाळा तलाव, शहरातील उद्याने, सुनसान ठिकाणी शोध घेतला. मात्र, त्यांच्या हाती संशयित राजू बिहारी हा लागला. त्याच्याकडे अधिक चौकशी करता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचा राहण्याच्या नेमका ठिकाणी नव्हता. तो फिरस्ता असल्याचे पुढे आले. त्याच्याकडे कसून चौकशी करता त्याने आपला व गणेश गटे व पूजा गटे यांच्याशी दोन दिवसांपूर्वी कामाचे ठिकाणी वाद झाला होता. त्याला कार्तिकीचे वडील जबाबदार आहेत, म्हणून संशयित बिहारीने कार्तिकीला भवानी मंडपातून तिचा खून करण्यासाठी पळवून नेले.
तिला रंकाळा तलावासमोरील एका मार्टच्या मागील अपार्टमेंटच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या आर.सी.सी. पाण्याच्या टाकीत जिवे ठार मारले, अशी कबुली संशयित बिहारीने दिली. त्याला गुन्ह्यात शुक्रवारी सकाळी अटक करून न्यायालयात हजर केले असता मंगळवारी (दि. २३) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप जाधव, प्रीतमकुमार पुजारी, अभिजीत इंगळे, सहायक फौजदार अनिल ढवळे, हवालदार परशुराम गुजरे, सतीश भांबरे, प्रशांत घोलप, सागर डोंगरे, प्रीतम मिठारी, गजानन गुरव आदींनी तपासात सहभाग घेतला.