आबांचे अडीच तास... ताणतणाव आणि उद्वेगाचे

By Admin | Published: September 30, 2014 12:14 AM2014-09-30T00:14:41+5:302014-09-30T00:15:59+5:30

सांगली : दुपारचा दीड वाजलेला. तासगाव तालुक्यातील ढवळीची सभा संपली.

Two and a half hours ... tension and excitement | आबांचे अडीच तास... ताणतणाव आणि उद्वेगाचे

आबांचे अडीच तास... ताणतणाव आणि उद्वेगाचे

googlenewsNext

श्रीनिवास नागे / सांगली
दुपारचा दीड वाजलेला. तासगाव तालुक्यातील ढवळीची सभा संपली. आर. आर. पाटील आबा गाडीत बसतात, तोच त्यांच्या अर्जावर ‘आॅब्जेक्शन’ घेतल्याचा व्हॉटस् अ‍ॅपवरचा ‘मेसेज’ एकानं दाखवला. आबा चमकले. त्यांना काहीच माहीत नव्हतं. लगेच फोनाफोनी सुरू झाली. पुढं दोन-तीन वस्त्यांना भेट देता-देताच भराभर फोन जोडले जाऊ लागले... गाड्या तासगावकडं वळल्या... आणि सुरू झाला अडीच तासांचा प्रचंड ताणाचा, तणावाचा आणि उद्वेगाचा प्रवास. चार वाजता अर्जावरचा आक्षेप फेटाळल्याचं वकिलांनी फोनवरून सांगितलं आणि आबांसह अख्ख्या तासगावानं सुस्कारा सोडला!
आज, सोमवारी आबांच्या प्रचाराचा नारळ ढवळीच्या महादेव मंदिरात फोडण्यात आला. तिथंच सभा झाली. ती दीडला संपली. एकानं जवळच्याच दोन-तीन वस्त्यांवर जायचा आग्रह केला. ऐनवेळी पुढं आलेल्या या कार्यक्रमामुळं आबा वैतागले. अखेर त्यांनी जाऊया म्हणून सांगताच गाड्या तिकडं वळल्या. तेवढ्यात त्यांच्या अर्जावर ‘आॅब्जेक्शन’ घेतल्याचा व्हॉटस् अ‍ॅपवरचा ‘मेसेज’ एकानं दाखवला. आबा एकदम चमकले. ‘खरं आहे का,’ विचारल्यावर गाडीतही कुणाला माहिती नसल्याचं दिसलं. छाननीसाठी कोण-कोण गेलंय, हे चौकशीनंतर समजलं. त्यांना फोन जोडायला सांगितलं. पाच मिनिटं फोनच जोडले गेले नाहीत... अस्वस्थता अजगरासारखी पसरू लागली. कुणीच काही कळवलं नसल्यानं आबांचा पारा चढलेला. मग आबांनी स्वत:च फोन लावला. माहिती घेतली. ती अर्धवटच आली... शेवटी वकिलांकडून कुणी आणि कोणत्या मुद्द्यावर आक्षेप घेतलाय, याची माहिती मिळाली. त्याच फोनवरून अधिकाऱ्यांकडे चौकशी केली गेली. बेळगावात मराठी भाषिकांसमोर प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल आबांविरुद्ध एफआरआय नोंद असल्याची माहिती उमेदवारी अर्जातील संबंधित रकान्यात भरली नसल्यानं, माहिती लपवून ठेवल्याचा आक्षेप भाजपचे उमेदवार अजितराव घोरपडेंनी घेतल्याचं समजलं. घोरपडेंनी तासगावात सांगलीतील वकिलांची फौज आणल्याचं कळताच आबा आणखी अस्वस्थ झाले.
पहिल्या वस्तीवर बायाबापड्यांनी ओवाळलं. तिथल्या कार्यकर्त्यांना ‘आॅब्जेक्शन’चं सांगून आबा लगेच गाडीत बसले. पुढच्या वस्तीवर जाईपर्यंत सांगलीतील वकिलांना फोन लावून काय झालंय आणि काय होईल, याचा अंदाज बांधण्यात आला. त्यांनी काळजीचं कारण नसल्याचं आणि घोरपडेंचा आक्षेप फेटाळला जाईल, असा दिलासा दिला.
दुसऱ्या वस्तीवर पुन्हा ‘आॅब्जेक्शन’बद्दल सांगण्याची वेळ आली. तिथं थांबण्याचा आग्रह करणाऱ्याला ‘अरे बाबा, तिकडं अर्ज छाननीतच उडाल्यावर काय उपयोग?’ असं आबांनी सुनावलंच... दरम्यान, छाननीत अर्ज उडाला, तर उच्च न्यायालयात आजच जावं लागणार असल्याचं कळलं. अर्जात आपण नेमकं काय-काय नमूद केलंय, यावर खल झाला. आक्षेपाचा मुद्दा नोंदवायला हवा होता काय, यावर काथ्याकूट झाला... उद्वेग वाढला होता. अर्ज भरताना सगळ्या वकिलांचा सल्ला घेऊनच भरला होता, मग आक्षेपाचा मुद्दा राहिलाच कसा, यावर उत्तर मिळेना! आता बाजू मांडण्यासाठी वकीलपत्र द्यायचं असल्यानं त्यावर सह्या करण्यासाठी तासगावला जावं लागणार होतं. तिसऱ्या वस्तीवर औक्षण झालं आणि गाड्या तासगावकडं वळल्या. पायलट जीपला मागं टाकून आबांच्या गाडीनं सुसाट तासगावचा रस्ता धरला. कुंभार वकिलांच्या घरीच सर्वांना यायला सांगितलं होतं. तिथं वकील मंडळी आधीच आली होती. कार्यकर्त्यांच्या गर्दीनं तणाव वाढला होता. सह्या होताच वकील घाईनं तहसीलदार कार्यालयाकडं पळाले. तहसील कार्यालयाला जणू मतमोजणीच्या वेळंचं स्वरूप आलं होतं. गर्दी वाढली होती. इकडे आबांचे फोनवर फोन सुरू होते आणि तिकडे घोरपडेंनी ठाण मांडलं होतं. तणाव वाढला होता.
अधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र तपासलं, त्यात एफआरआय नोंद असल्याची माहिती दिल्याचं दिसून आलं. बेळगावात गुन्हा नव्हे तर केवळ एफआरआय नोंद होता. ते अर्जावरच्या रकान्यात नमूद केलेलं नव्हतं, मात्र माहितीपत्रात होतं. साडेतीनला निवडणूक निरीक्षक आले, पाच-दहा मिनिटात घोरपडेंचा आक्षेप फेटाळल्याचं स्पष्ट झालं आणि फटाके उडू लागले... तिकडं वकिलांच्या घरी बसलेल्या आबांसह अख्ख्या तासगावानं सुस्कारा सोडला!

Web Title: Two and a half hours ... tension and excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.