बाबा जरग नगरात अडीच लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:25 AM2021-05-13T04:25:57+5:302021-05-13T04:25:57+5:30
कोल्हापूर : येथील बाबा जरग नगरात अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ...
कोल्हापूर : येथील बाबा जरग नगरात अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व मोबाईल लंपास केले. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी विजय तुकाराम नार्वेकर (रा. बाबा जरग नगर, कोल्हापूर. मूळ गाव- शेळप पोस्ट गवसे, ता. आजरा) यांनी रात्री करवीर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विजय नार्वेकर हे बाबा जरग नगरात रघुनाथ सूर्यवंशी यांच्या घरी भाड्याने राहतात. ते मंगळवारी रात्री सहपरिवार बाहेरगावी गेले होते. चोरट्याने त्यांच्या गेटचे व दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतील दोन तोळे वजनाची सोन्याची बिस्किटे, दोन तोळे वजनाचे सोन्याचे लॉकेट व चेन, एक तोळे वजनाची सोन्याची चेन, पाच ग्रॅमचे सोन्याचे मणी-मंगळसूत्र तसेच मोबाईल असा सुमारे २ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला. बुधवारी सकाळी ही घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली. याबाबत करवीर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या चोरीची तक्रार बुधवारी रात्री करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. पुढील तपास पो.नि. संदीप कोळेकर करत आहेत.