अष्टमीला अंबाबाई चरणी अडीच लाख भाविक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 12:34 PM2019-10-07T12:34:02+5:302019-10-07T12:36:28+5:30

अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्वसात रविवारी भाविकांची उच्चांकी गर्दी झाली. अष्टमी आणि रविवारचा योग साधून अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी कोल्हापूर फुलले. पहाटे एक वाजल्यापासून दर्शनरांगा भरून ओसंडून वाहत होत्या. भाऊसिंगजी रोड, भवानी मंडपापर्यंत लांबच लांब रांगा आणि नजर जाईल तिकडे भाविकच भाविक दिसत होते. रात्रीपर्यंत अडीच लाख भाविकांची नोंद झाली.

Two and a half lakh devotees in Ambati phase eight | अष्टमीला अंबाबाई चरणी अडीच लाख भाविक

अष्टमी आणि रविवारचा योग साधून कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी रांगा भरून गेल्या होत्या. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Next
ठळक मुद्देअष्टमीला अंबाबाई चरणी अडीच लाख भाविक यंदाच्या उत्सवातील उच्चांकी संख्या : शहर फुलले

कोल्हापूर : अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्वसात रविवारी भाविकांची उच्चांकी गर्दी झाली. अष्टमी आणि रविवारचा योग साधून अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी कोल्हापूर फुलले. पहाटे एक वाजल्यापासून दर्शनरांगा भरून ओसंडून वाहत होत्या. भाऊसिंगजी रोड, भवानी मंडपापर्यंत लांबच लांब रांगा आणि नजर जाईल तिकडे भाविकच भाविक दिसत होते. रात्रीपर्यंत अडीच लाख भाविकांची नोंद झाली.

यंदा घटस्थापना आणि अष्टमी हे नवरात्रौत्सवाचे दोन्ही महत्त्वाचे दिवस रविवारी आले आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशीदेखील मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. उत्सवात अष्टमीला देवीने महिषासुराचा वध केल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे ज्यांना नवरात्रात देवीचे दर्शन घेता आले नाही, ते अष्टमीला येतात.

शनिवारपासूनच परस्थ भाविकांनी भरलेली वाहने कोल्हापुरात दाखल झाली होती. मंदिर पावणेपाच वाजता उघडते. मात्र देवीचे पहिले दर्शन घेण्यासाठी भाविक मध्यरात्री एक-दोन वाजल्यापासून मंदिराबाहेरच्या रांगेत थांबले होते. पाचच्या काकडआरतीलाच मंदिर भाविकांनी भरून गेले होते. रात्रीपर्यंत अडीच लाख भाविकांची नोंद झाली असून, ही यंदाच्या नवरात्रौत्सवातील उच्चांकी गर्दी होती.

दुपारी बारा वाजता महिला भाविकांची रांग भवानी मंडपापर्यंत तर पुरुषांची रांग जोतिबा रोडवरून भाऊसिंगजी रोडपर्यंत गेली होती. त्यातच फलटणच्या महिला भाविकांनी भरलेल्या चार बसेस कोल्हापुरात दाखल झाल्याने गर्दीत आणखी भर पडली. पहाटेपासून महाद्वार रोड, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, बिंदू चौक, शिवाजी चौक, ताराबाई रोड, खरी कॉर्नर हा सगळा मंदिर बाह्य परिसर भाविकांच्या गर्दीने भरला होता.

रस्त्यांवर सगळीकडे काठापदराच्या साड्या नेसलेल्या महिला, पारंपरिक वेशातील युवक-युवती अशा आबालवृद्धांचे लोंढेच्या लोंढे दिसत होते. देवीचे दर्शन झाले की परस्थ भाविकांची पावले परिसरातील खाऊ गल्ली, खासबाग येथील खाऊ गल्ली तसेच बाजारपेठेकडे वळत होती. खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत कपड्यांपासून शोभेच्या साहित्यापर्यंत इमिटेशन ज्वेलरीपासून ते खेळण्यांपर्यंतच्या साहित्याची खरेदी केली जात होती.

वाहतुकीची कोंडी

भाविकांच्या या उच्चांकी गर्दीमुळे शहरात मात्र सर्वत्र वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. मंदिराकडे जाणारे शिवाजी चौक, खरी कॉर्नर, ताराबाई रोड येथील रस्ते बॅरिकेट्स लावून वाहनांसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे सगळी वाहने वळून खरी कॉर्नर ते मिरजकर तिकटी, खासबाग, बिंदू चौक, शिवाजी पुतळा, महापालिका, लक्ष्मीपुरी या प्रमुख रस्त्यांवर येत होती. येथे वाहतूक पोलीस व पोलिसांकडून गर्दीचे नियंत्रण केले जात होते. मुख्य रस्त्यांवर बॅरिकेटिंग केल्यामुळे वाहतुकीचा ताण थोडा कमी झाला.
 

 

Web Title: Two and a half lakh devotees in Ambati phase eight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.