अडीच हजार पेन्शनरांना सातव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:26 AM2021-02-24T04:26:37+5:302021-02-24T04:26:37+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सर्व कायम कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून सातव्या वेतन आयोगानुसार वेतन अदा करण्यात आले; परंतु सुमारे अडीच हजार निवृत्त ...
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सर्व कायम कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून सातव्या वेतन आयोगानुसार वेतन अदा करण्यात आले; परंतु सुमारे अडीच हजार निवृत्त कर्मचाऱ्यांचा विषय मात्र प्रलंबित राहिला आहे. आर्थिक परिस्थिती पाहून प्रत्येक महिन्यात पन्नास, शंभर निवृत्त कर्मचाऱ्यांना वाढ देऊ, असे प्रशासनाचे म्हणणे आहे, तर कर्मचारी संघाने आणखी महिना लागला तर लागू दे, पण सर्वांना एकाच वेळी द्या, असा आग्रह धरला आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीकरिता कर्मचारी संघाने बेमुदत संपाची नोटीस दिली होती. त्यावेळी कर्मचारी संघाचे पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी यांच्यात चर्चा होऊन शासनाने घालून दिलेल्या अटींनुसार करार झाला. घरफाळ्याच्या जुन्या थकबाकीच्या पन्नास टक्के, तर चालू मागणीच्या नव्वद टक्के वसुली करण्याच्या अटीवर सातवा वेतन आयोग लागू केला, तसेच जानेवारीपासून वेतन अदा केले.
परंतु निवृत्त कर्मचाऱ्यांचा विषय मात्र प्रलंबित राहिला. सुमारे अडीच हजार सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांच्या वेतनात मात्र वाढ समाविष्ट करण्यात आलेली नाही. काही कर्मचाऱ्यांनी महानगरपालिका कर्मचारी संघाकडे याबाबत विचारणा केली. संघाचे अध्यक्ष संजय भोसले यांनी प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली. तेव्हा प्रशासनाकडून आर्थिक कारण देत प्रत्येक महिन्याला पन्नास, शंभर कर्मचाऱ्यांना देऊ असे सांगण्यात आले. तेंव्हा असा भेदभाव करु नका, एखादा महिना वेळ झाला तर होऊ दे, पण सर्वांना एकावेळीच लागू करा, असा आग्रह कर्मचारी संघाने धरला आहे.
-२५० निवृत्त कर्मचारी सहाव्याच्या प्रतीक्षेत-
पालिकेच्या २५० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अद्याप सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे निवृत्तिवेतन मिळत नाही. गेल्या दहा वर्षापासून ते कर्मचारी पाठपुरावा करत आहेत. सन २०१९ मध्ये त्यांना फरक देण्याचा निर्णय महासभेने घेतला; परंतु त्याचीही अजून अंमलबजावणी झालेली नाही. प्रत्येक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनात ५०० रुपयांपासून ३५०० रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यात ५०० ते ७०० रुपयांची वाढ होणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे.