‘नोंदणीकृत पदवीधर’मधून दोन अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 11:20 PM2017-10-26T23:20:25+5:302017-10-26T23:26:57+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांसाठीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांसाठीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीतील नोंदणीकृत पदवीधर गटामध्ये गुरुवारी दोन अर्ज दाखल झाले आहेत.
विद्यापीठाची अधिकार मंडळे नवीन विद्यापीठ कायद्यानुसार अस्तित्वात येणार आहेत. अधिसभा, विद्या परिषद, विविध विद्याशाखांच्या एकूण ४७ अभ्यास मंडळांवरील १८८ जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यातील अधिसभेसाठी शिक्षक, प्राचार्य आणि नोंदणीकृत पदवीधर गटाकरिता प्रत्येकी दहा जागा, संस्था प्रतिनिधींच्या सहा, विद्यापीठ कॅम्पसवरील शिक्षकांच्या तीन जागा आहेत.
त्यासह विद्या परिषदेसाठी शिक्षक गटातील आठ जागा आहेत. विविध विद्याशाखांच्या एकूण ४७ अभ्यास मंडळांवरील प्रत्येकी तीन अशा एकूण १४१ जागांचा समावेश आहे. या सर्व जागांसाठी दि. १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्जविक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सोमवारी (दि. २३) पासून सुरू झाली. या प्रक्रियेअंतर्गत गुरुवारपर्यंत एकूण ७२० अर्जांची विक्री झाली आहे. नोंदणीकृत पदवीधर गटात गुरुवारी सायंकाळपर्यंत दोन अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिली.