दोघा घरफोड्यांना अटक; १६ लाखांचा ऐवज जप्त
By admin | Published: April 2, 2016 12:33 AM2016-04-02T00:33:07+5:302016-04-02T00:36:55+5:30
आणखी गुन्हे उघडकीस येणार : गडहिंग्लज परिसरातील सात घरफोड्यांची कबुली; आज न्यायालयात हजर करणार
कोल्हापूर : गडहिंग्लज परिसरात बंद घर दिसले की फोडणाऱ्या दोघा अट्टल घरफोड्यांना शिताफीने गडहिंग्लज पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपी राजासाहब गुलाब नाईकवडी (वय २५) व मोदीन रसूल सुतार (४९,रा. सोलापूर, ता. हुक्केरी, जि. बेळगांव) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ४५ तोळे सोने व दहा किलो चांदीचे दागिने असा सुमारे १६ लाख ७ हजार किमतीचा ऐवज हस्तगत केला. त्यांच्याकडून आणखी काही घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
गडहिंग्लज परिसरात दि. १५ फेब्रुवारीपासून गावोगावी घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. चोरट्यांच्या सुळसुळाटाने नागरिक हैराण झाले होते तर पोलिसांची झोपच उडाली होती. प्रत्येक घरफोडीची पद्धत एकसारखी असल्याने अशाप्रकारचे गुन्हे सीमाभागातील गुन्हेगार करतात, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांना मिळाली. त्यांनी पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांना माहिती घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रियांका शेळके, कॉन्स्टेबल आर. एल. पाटील, अशोक शेळके, दयानंद बेनके, संदीप कांबळे, संतोष घस्ती यांनी कर्नाटक सीमाभागातील पोलिस ठाण्यांतून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेतली असता राजासाब नाईकवडी व मोदीन सुतार यांची नावे पुढे आली. त्यांना त्यांच्या सोलापूर येथील घरातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गडहिंग्लज शहर, आत्याळ, बेळगुंदी, भडगांव, हनिमनाळ, नांगनूर तसेच हातकणंगले तालुक्यातील हुपरी-रेंदाळ आदी ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यांनी चोरीचे दागिने सोलापूर गावाशेजारी ओढ्याजवळ झुडपात दोन फूट जमिनीत पुरून ठेवले होते. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता पिशवीमध्ये ठेवलेले दागिने मिळाले. हा परिसर निर्जन असल्याने या दागिन्यांची चाहूल कोणाला लागली नाही. गेल्या दीड महिन्यांत त्यांनी चोरीचे दागिने लपविले, त्यांची विक्री केली नाही. नाईकवडी याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सुतार याला आज, शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी सांगितले.
दिवसा टेहाळणी,
रात्री घरफोडी
राजासाब नाईकवडी याच्या आईचा बांगड्याचा व्यवसाय आहे. तो व साथीदार मोदीन सुतार हे दिवसा गावोगावी फिरत बंद घराची टेहाळणी करत असत. त्यानंतर रात्री बंद घर फोडत असत. घरफोडी करताना मोदीन हा बाहेर पाळत ठेवत असे व राजासाब हा आतमध्ये शिरून दागिने लंपास करत असे. हे दोघेही सराईत चोरटे असून त्यांच्यावर संकेश्वर, निपाणी पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.