फसवणूकप्रकरणी जयसिंगपूर, सांगलीच्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:27 AM2021-04-09T04:27:11+5:302021-04-09T04:27:11+5:30
जयसिंगपूर : भाजीपाल्याच्या निर्यात व्यवसायामध्ये ५३ लाख ८५ हजार रुपयाची गुंतवणूक करावयास भाग पाडून फसवणूक करून दोन वर्षांपासून फरार ...
जयसिंगपूर : भाजीपाल्याच्या निर्यात व्यवसायामध्ये ५३ लाख ८५ हजार रुपयाची गुंतवणूक करावयास भाग पाडून फसवणूक करून दोन वर्षांपासून फरार असणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. शरद व्यंकटेश कुलकर्णी (वय ४८, रा. शाहूनगर, जयसिंगपूर) व त्याचा साथीदार प्रमोद बाळकृष्ण चव्हाण (४९, रा. पलूस, जि. सांगली) अशी संशयितांची नावे असून, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी सांगितले की, संशयित कुलकर्णी हा भाजीपाला आयात-निर्यात व्यावसायिक आहे. ओळखीचा फायदा घेऊन या व्यवसायामध्ये तिघांना पैसे गुंतविण्यास भाग पाडले होते. गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा न झाल्याने त्यांनी पैशासाठी तगादा लावला होता. यावेळी संशयित खोटे सांगून वेळ मारून नेत होता. १२ डिसेंबर २०१९ रोजी कुलकर्णी व चव्हाण यांच्याविरोधात जयसिंगपूर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, बुधवारी (दि. ७) दोघे संशयित सांगली येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. संशयितांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून, त्या दृष्टीने तपास सुरू आहे.
फोटो - ०८०४२०२१-जेएवाय-०८-संशयित प्रमोद चव्हाण, संशयित शरद कुलकर्णी