दाम्पत्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 01:41 PM2019-08-22T13:41:22+5:302019-08-22T13:44:06+5:30
पैशासाठी तगादा लावून कणेरकरनगर येथील दाम्पत्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करून दोघांना बुधवारी रात्री उशिरा अटक केली. संशयित राहुल आनंदराव पाटील (वय ३१, रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर), राजू जाफर जमादार (३६, रा. बिडी कामगार चाळ, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. मुख्य संशयित मंगल प्रताप चव्हाण व राजू कांबळे फरार असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली.
कोल्हापूर : पैशासाठी तगादा लावून कणेरकरनगर येथील दाम्पत्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करून दोघांना बुधवारी रात्री उशिरा अटक केली. संशयित राहुल आनंदराव पाटील (वय ३१, रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर), राजू जाफर जमादार (३६, रा. बिडी कामगार चाळ, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. मुख्य संशयित मंगल प्रताप चव्हाण व राजू कांबळे फरार असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली.
अधिक माहिती अशी, शिवाजी पांडुरंग पोर्लेकर (वय ४०) व त्यांची पत्नी सिद्धी पोर्लेकर (३५) हे दोघे मूळचे दत्तोबानगर कळंबा येथील रहिवाशी. २०१४ मध्ये ते कणेरकर नगरात मंगल चव्हाण यांच्या घरात भाड्याने राहत होते. शिवाजी पोर्लेकर यांनी संशयित आरोपी मंगल चव्हाण, राहुल पाटील, राजू जमादार, राजू कांबळे यांच्याकडून उसने पैसे घेतले होते. ते परत करूनही आणखी पैशासाठी या चौघांनी तगादा लावला होता.
या त्रासाला कंटाळून पोर्लेकर दाम्पत्याने १९ आॅगस्ट २०१४ रोजी राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यांनी संशयितांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली होती.
हस्ताक्षर शिवाजी पोर्लेकर यांचेच आहे काय, याबाबतच पुणे येथील प्रयोगशाळेत चिठ्ठी पाठविली होती. २ आॅगस्टला त्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यावरून संशयितावर गुन्हा दाखल केला. उमेश पांडुरंग पोर्लेकर (वय ३८, रा. कळंबा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक एम. एम. माळी तपास करीत आहेत.