मराठा आंदोलनात सोन्याच्या चेन चोरणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 06:52 PM2021-06-17T18:52:58+5:302021-06-17T18:54:37+5:30
Crimenews Kolhapur : मराठा समाज आरक्षण मूक आंदोलनासाठी नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधिस्थळी दोघा आंदोलकांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन चोरट्यांनी लंपास केल्या. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोघांना घटनास्थळीच अटक केली. अविनाश बन्सी गायकवाड (४८) व जितेंद्र मुरलीधर काळे (५५ दोघेही रा. बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने दि. २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
कोल्हापूर : मराठा समाज आरक्षण मूक आंदोलनासाठी नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधिस्थळी दोघा आंदोलकांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन चोरट्यांनी लंपास केल्या. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोघांना घटनास्थळीच अटक केली. अविनाश बन्सी गायकवाड (४८) व जितेंद्र मुरलीधर काळे (५५ दोघेही रा. बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने दि. २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
कोल्हापुरातील ऐतिहासिक नर्सरी बागेत मराठा आरक्षण मूक आंदोलन होते. त्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आंदोलनासाठी आले होते. गर्दीचा फायदा उठवत चोरट्यांनी दोघा कार्यकर्त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन हिसडा मारून लांबवल्या. याबाबत सतीश तुकाराम पोवार (३४, रा. कागल) याने आपल्या गळ्यातील १३ ग्रॅम वजनाची ५२ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन तर अजित रामराव इंगळे (४८, रा. कागल) यानेही आपल्या गळ्यातील १० ग्रॅमची ४० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरट्यांनी लांबवल्याची तक्रार लक्ष्मीपुरी पोलिसांत दिली.
दरम्यान, गर्दीचा फायदा उठवत सोन्याचे चेन चोरल्याच्या संशयावरून लक्ष्मीपुरी पोलिसांनी बीड येथील अविनाश गायकवाड व जितेंद्र काळे यांना अटक करून त्यांची चौकशी केली. प्रारंभी त्यांनी करमळा येथून आंदोलनासाठी आल्याचे सांगितले; पण नंतर पोलिसांनी खाक्या दाखवला असता बीडहून चोऱ्या करण्यासाठी आल्याची त्यांनी कबुली दिली. सहकारी अटक केल्याची माहिती मिळताच चोरलेल्या सोन्याच्या चेन घेऊन त्यांचा तिसरा साथीदार हा घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून कोल्हापूर-सांगली मार्गावर त्याचा माग काढण्याच्या प्रयत्न केला; पण तो सापडला नाही.