सोळापेक्षा जास्त उमेदवार असल्यास दोन मतपत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 01:04 AM2019-04-08T01:04:51+5:302019-04-08T01:04:56+5:30
प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी एका मतदारसंघात सोळापेक्षा जादा उमेदवार रिंगणात राहिल्यास मतदान केंद्रामध्ये ...
प्रवीण देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी एका मतदारसंघात सोळापेक्षा जादा उमेदवार रिंगणात राहिल्यास मतदान केंद्रामध्ये दोन मतपत्रिका ठेवाव्या लागणार
आहेत. ‘कोल्हापूर’मधून २२ व ‘हातकणंगले’मधून २० उमेदवारांचे अर्ज आहेत. यातील किती उमेदवार माघार घेतात याकडे निवडणूक विभागाच्याही नजरा लागून राहिल्या आहेत; कारण माघारीनंतरही सोळापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात राहिल्यास दोन मतपत्रिका कराव्या लागणार आहेत. त्यानुसार निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे.
कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांतून मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. माघारीनंतर सोळापेक्षा जादा अर्ज राहिल्यास निवडणूक विभागाला (ईव्हीएम) दोन मतपत्रिका कराव्या लागणार आहेत. हे चित्र आज, सोमवारी माघारीनंतर स्पष्ट होणार आहे, असे असले तरी निवडणूक विभागाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. माघारीनंतर १६ पेक्षा कमी उमेदवार रिंगणात राहिले, तर एक (ईव्हीएम) मतपत्रिका तयार करावी लागणार आहे. तसे न होता जादा उमेदवार रिंगणात राहिल्यास मतदान केंद्रामध्ये दोन ‘ईव्हीएम’ची बॅलेट युनिट बसवावी लागणार आहेत.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २१३२ व हातकणंगले मतदारसंघात १८०७ असे मिळून ३९३९ मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्रावर एक मशीन या प्रमाणे ३९३९ ‘ईव्हीएम’ उपलब्ध असून, राखीव कोट्यात जवळपास तीन हजार मशीन ठेवण्यात आल्या आहेत. तरीही सोळापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात राहिल्यास आणखी काही ‘ईव्हीएम’ची आवश्यकता भासणार आहे; त्यामुळे या मशीन भारत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन घेऊन इतर जिल्ह्यातील घेण्याची तयारी निवडणूक विभागाने ठेवली आहे. माघारीनंतर सोळापेक्षा कमी उमेदवार रिंगणात राहिल्यास एकाच मतपत्रिकेवर (ईव्हीएम)काम भागणार आहे. किती उमेदवार रिंगणात राहतात यावरच पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.
मतपत्रिकेवर पंधरा
अधिक एक ‘नोटा’
निवडणुकीसाठी एका मतपत्रिकेवर (ईव्हीएम) १५ उमेदवार अधिक एक ‘नोटा’ अशी रचना आहे. जर १६ उमेदवारांपेक्षा अधिक उमेदवार रिंगणात राहिल्यास दुसरी मतपत्रिका तयार करावी लागणार आहे.