बंधुप्रेम!, फक्त पाच मिनिटं, अन् दोघा भावांची चटका लावणारी एक्झिट; कोल्हापुरातील ठिकपुर्लीमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 07:42 PM2023-04-10T19:42:57+5:302023-04-10T19:51:02+5:30
चौघा भावांचा जिव्हाळा हा परिसरात चर्चेचा विषय असायचा
व्ही. जे.साबळे
तुरंबे (कोल्हापूर): दोन भावांमध्ये अतूट प्रेम, जिव्हाळ्याचे नाते आणि बंधुभाव ही आजच्या युगात दुरापास्त असलेली गोष्ट. मात्र एकमेकाला आयुष्यभर साथ देणारे भाऊ एकाच दिवशी साथ सोडून गेल्याची दुर्दैवी घटना राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्लीत घडली. विलास बाबुराव भंडारी (वय-८१) आणि जयसिंग बाबुराव भंडारी (६३) या सख्य्या भावांनी अवघ्या पाच मिनिटाच्या अंतराने जगाचा निरोप घेतला. अन् अख्ख गाव हळहळल. अखेरच्या श्वासापर्यंत या दोघा भावांनी आपला बंधुभाव जपला अन् शेवटच्या क्षणीही एकमेकांची साथ सोडली नाही असाच हा प्रसंग म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
जमिनीचे वाद असो व्वा किरकोळ कारणावरुनही भावा-भावांमध्ये वाद असल्याचे आपण अनेकदा बघितले आहे. यातून अगदी हाणामारी अन् खून देखील झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, भंडारी बंधू याला अपवाद आहेत. आजच्या या युगातही या सगळ्याला बगल देत भंडारी कुटुंबियातील हे चौघे भाऊ खडतर परिस्थितीतही गुण्यागोविंदाने राहत. यातील दोघा भावांची शनिवारी (दि.८) अवघ्या पाच मिनिटाच्या अंतराने झालेली एक्झिट सर्वांच्या मनाला चटका लावून गेली.
ठिकपुर्ली येथील विलास, जयसिंग, मुरलीधर व प्रल्हाद या चार बंधूंनी अत्यंत गरिबीच्या परिस्थितीशी झुंजत कापड व्यवसायात जम बसवला होता. व्यवसाय सांभाळत असताना त्यांनी एकत्र कुटुंबाची नाळ कधीही तुटू दिली नव्हती. चौघा भावांचा जिव्हाळा हा परिसरात चर्चेचा विषय असायचा.
शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास जयसिंग यांचे आकस्मित निधन झाले. भावाच्या निधनाचा धक्का बसून अवघ्या पाच मिनिटाच्या अंतराने थोरले बंधू विलास यांनीही जगाचा निरोप घेतला. अगदी जन्मभर एकमेकांशी जिव्हाळा सांभाळत कुटुंब एकत्र राखलेल्या दोन भावाने एकाच वेळी जगाचा निरोप घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती.