रेकी करून दुचाकी चोरायचे, दागिने हिसकावयाचे; कोल्हापूर पोलिसांनी दोघा सख्ख्या भावांना कर्नाटकात केली अटक

By उद्धव गोडसे | Published: September 25, 2023 03:56 PM2023-09-25T15:56:07+5:302023-09-25T16:18:18+5:30

१२ गुन्ह्यांची उकल, तीन लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त

two brothers used to steal bikes by doing Reiki, stole jewels; Kolhapur police made an arrest in Karnataka | रेकी करून दुचाकी चोरायचे, दागिने हिसकावयाचे; कोल्हापूर पोलिसांनी दोघा सख्ख्या भावांना कर्नाटकात केली अटक

रेकी करून दुचाकी चोरायचे, दागिने हिसकावयाचे; कोल्हापूर पोलिसांनी दोघा सख्ख्या भावांना कर्नाटकात केली अटक

googlenewsNext

कोल्हापूर : रेकी करून दुचाकी चोरी आणि महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणा-या दोन सख्ख्या भावांना शाहूपुरी पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली. अशरफअली शेरअली नगारजी (वय १९) आणि सैफअली शेरअली नगारजी (वय २३, दोघे रा. निपाणी, जि. बेळगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

या दोघांच्या चौकशीत १२ गुन्ह्यांची उकल झाली असून, त्यांच्याकडून चोरीतील पाच दुचाकी आणि दोन लाखांचे दागिने हस्तगत केल्याची माहिती शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी सोमवारी (दि. २५) पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, निपाणी येथील अशरफअली आणि सैफअली हे दोघे सीमाभागातील सराईत चोरट्यांच्या टोळीत सक्रीय आहेत. त्यांनी तीन महिन्यांपूर्वी सदर बाजार येथे एक खोली भाड्याने घेतली. त्यानंतर अन्य दोन साथीदारांसह रेकी करून ते दुचाकी चोरी आणि महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचे प्रकार करीत होते. गुन्हे केल्यानंतर चारही संशयित खोली सोडून कर्नाटकात गेले होते. यातील दोघांना कर्नाटकातील रायलपाडू (जि. कोलार) आणि हनूर (जि. चामराजनगर) पोलिस ठाण्यात दैनंदिन हजेरी लावणे बंधनकारक असल्याची माहिती मिळताच, शाहूपुरी पोलिसांनी कर्नाटक पोलिसांशी पत्रव्यवहार करून दोघांना ताब्यात घेतले.

अधिक चौकशीत नगारजी बंधूंनी आणखी दोन साथीदारांना सोबत घेऊन १२ गुन्हे केल्याची कबुली दिली. यात दुचाकी चोरीचे पाच गुन्हे, तर जबरी चोरीच्या सात गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी संशयितांकडून एक लाख ३० हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी आणि जबरी चोरीतील चार मंगळसूत्र, एक बोरमाळ, एक मोहनमाळ आणि सोन्याचा सर असा दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण, सहायक फौजदार संदीप जाधव, संजय जाधव, मिलिंद बांगर, लखनसिंह पाटील, शुभम संकपाळ, बाबासाहेब ढाकणे, रवी आंबेकर, विकास चौगुले, महेश पाटील, वीरेंद्र वडेर, आदींनी केली.

Web Title: two brothers used to steal bikes by doing Reiki, stole jewels; Kolhapur police made an arrest in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.