दोन बल्बचे बिल १८ हजार रुपये !
By admin | Published: October 12, 2015 11:49 PM2015-10-12T23:49:09+5:302015-10-13T00:26:47+5:30
ढगेवाडीतील प्रकार : वीज कंपनीची अनागोंदी
ऐतवडे बुद्रुक : ढगेवाडी (ता. वाळवा) येथील वीज ग्राहक आप्पासाहेब भाऊ खोत यांना वीज वितरण कंपनीने वीज बिलाचा जबरदस्त झटका दिला आहे. घरी फक्त दोन बल्ब असलेल्या खोत यांना सप्टेंबर महिन्याचे १७ हजार ८३0 रुपये बिल पाठवून वीज वितरणचा अंदाधुंद कारभार दाखवून दिला आहे.येथील आप्पासाहेब भाऊ खोत यांचा ग्राहक क्रमांक २८४७९0२५६६२८ आहे. त्यांच्या घरी फक्त दोन बल्ब आहेत. त्यांना डिसेंबर २0१४ पासून वाढीव बिल येत आहे. त्यावेळी त्यांना आठ हजार रुपये बिल आले होते. त्यानंतर त्यांनी स्थानिक वायरमन व ऐतवडे बुद्रुक येथील शाखा कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्यांना तात्पुरते बिल कमी करुन देण्यात आले व त्यानंतर बिल व्यवस्थित येईल, असे आश्वासन दिले गेले. परंतु तेव्हापासून दर महिन्याला वाढीव बिल येत होते व दर महिन्याला आप्पासाहेब खोत कार्यालयात जाऊन बिल कमी करुन घेत आहेत.
बिलाचे रीडिंग व मीटर नादुरुस्त असल्यास बदलून मिळावे यासाठीही त्यांनी अर्ज दिला आहे. शिवाय दर महिन्याला बिल भरुन देखील सप्टेंबरअखेर त्यांना १७ हजार ८३0 रुपये बिल आले आहे. वीज वितरणच्या कारभाराचा त्रास संबंधित ग्राहकाला सहन करावा लागत आहे. बिलाबाबत तोडगा काढावा, अन्यथा वीज कार्यालयासमोर गांधीगिरी पध्दतीने आंदोलन करण्याचा इशारा खोत यांनी दिला आहे. (वार्ताहर)
ऊर्जामित्र बैठकीत तक्रार
शिराळा येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘ऊर्जामित्र’ बैठकीत खोत यांनी याबाबतची तक्रार केली होती. त्यावेळी आ. शिवाजीराव नाईक यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. यावेळी खोत यांना ताबडतोब बिल दुरुस्ती करून देण्याचे व आवश्यकता असल्यास मीटर बदलून देण्याचे सांगण्यात आले होते. परंतु अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.