दोन सराईत घरफोड्यास अटक, ११ घरफोड्या उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:23 PM2020-08-13T17:23:22+5:302020-08-13T17:37:15+5:30
कोल्हापूर शहरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांसह दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली. प्रशांत काशिनाथ कुरेशी (वय ३० रा. इस्पुर्ली, ता. करवीर) व त्याचा साथीदार अविनाश शिवाजी आडवकर (वय २८, रा. पंढरे गल्ली, खापरे माळ रोड, गोकुळ शिरगाव, ता. करवीर. मूळ गाव धामणे, ता. आजरा) अशी त्यांची नावे आहेत.
कोल्हापूर : शहरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांसह दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली. प्रशांत काशिनाथ कुरेशी (वय ३० रा. इस्पुर्ली, ता. करवीर) व त्याचा साथीदार अविनाश शिवाजी आडवकर (वय २८, रा. पंढरे गल्ली, खापरे माळ रोड, गोकुळ शिरगाव, ता. करवीर. मूळ गाव धामणे, ता. आजरा) अशी त्यांची नावे आहेत.
शहरातील ११ घरफोड्या उघडकीस आल्या. त्याच्याकडून चोरीची आलिशान कार, एक रिव्हॉल्व्हर, तेरा जिवंत काडतुसे व सोन्याचे ३४० ग्रॅम दागिने, एलईडी टीव्ही, मिक्सर असा सुमारे २७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
कोरोनामुळे अनेकजण उपचारासाठी घराबाहेर अथवा मूळ गावी गेल्याने अनेक घरे बंद आहेत. त्यामुळे घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे.
त्या अनुषंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणीची विशेष मोहीम स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने हाती घेतली. त्या पार्श्वभूमीवर दि. २ ऑगस्ट रोजी सराईत गुन्हेगार प्रशांत कुरेशी हा शिये फाटा (ता. हातकणंगले) येथे येणार असल्याची माहिती निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली. तेथे सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विनानंबर आलिशान मोटार मिळाली.
मोटारीत घरफोड्या करण्याचे साहित्य मिळाले. चौकशीत, त्याने ही मोटार अविनाश आडवकर याच्या मदतीने जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निखिल उत्तम मुळे (रा. छत्रपती कॉलनी, रामानंदनगर रोड) यांची चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आडवकरलाही अटक केली. दोघांनाही न्यायालयाने आज, शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी दिली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, संतोष पवार, श्रीकांत मोहिते, नेताजी डोंगरे, सचिन गुरखे, राजेश आडूळकर, नितीन चोथे, विजय तळसकर, सागर कांडगावे, ओंकार परब, राजेंद्र हांडे, अजित वाडेकर, रणजित पाटील, संजय पडवळ, संतोष पाटील, रणजित कांबळे, रफिक आवळकर, सुरेश पवार, वैशाली पाटील, सुप्रिया कात्रट, सायबर पोलीस ठाण्याचे अमर वासुदेव, संदीप गुरव यांनी केली.
मोटार चोरणे व वापरानंतर सोडून देणे
संशयित कुरेशी याने आतापर्यंत चार मोटारी चोरल्या, त्यांचा घरफोड्यांच्या कामासाठी वापर केला. तीन मोटारी वापरून सोडून सोडल्या. ताब्यातील एक मोटार पोलिसांनी जप्त केली.
घरफोड्या कोल्हापुरात, चोरीचे साहित्य पुण्यात
वर्षभरात त्याने शहरातील जुना राजवाडा, राजारामपुरी, शाहूपुरी, करवीर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्या व चोऱ्या केल्याचे निष्पन्न झाले. संशयित कुरेशी हा मूळचा इस्पुर्ली येथील असला तरी त्याने पुण्यात आनंदवन रेसिडेन्सी,मोती बेकरीसमोर, धायरी येथे भाड्याने फ्लॅट घेतला होता. त्या फ्लॅटमधून घरफोड्या व चोरीचे सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले.
जप्त रिव्हॉल्व्हर फरार प्रकाश बांदिवडेकरचे
पोलिसांनी कुरेशी याच्याकडून पुण्यातील भाड्याच्या फ्लॅटमधून जप्त केलेले रिव्हॉल्व्हर व १३ जिवंत काडतुसे हे पोलीस रेकॉर्डवरील फरार गुन्हेगार डॉ. प्रकाश साताप्पा बांदिवडेकर याच्या मालकीचे आहे. त्याचा रिव्हॉल्व्हर परवानाही जप्त केला.
दरम्यान, बांदिवडेकर याने हे वर्षापूर्वी रिव्हॉल्व्हर चोरीला गेल्यानंतरही त्याची पोलिसांत तक्रार दिली नसल्याने त्याची सखोलपणे चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले.