कळंबा कारागृहातील दोघे कोरोनाबाधित कैदी पळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:23 AM2021-05-15T04:23:55+5:302021-05-15T04:23:55+5:30
कोल्हापूर : कोरोना संसर्गाने बाधित झालेल्या कळंबा कारागृहातील दोघा कैद्यांनी उपचारासाठी खास तयार केलेल्या कोविड केंद्रातून शुक्रवारी मध्यरात्री ...
कोल्हापूर : कोरोना संसर्गाने बाधित झालेल्या कळंबा कारागृहातील दोघा कैद्यांनी उपचारासाठी खास तयार केलेल्या कोविड केंद्रातून शुक्रवारी मध्यरात्री धूम ठोकली. पलायन केलेल्यांमध्ये खुनाच्या गुन्ह्यात न्यायाधीन बंदी असलेला प्रतीक सुहास सरनाईक (वय ३०, रा. आर.के.नगर, पाचगाव रोड, साई काॅलनी, कोल्हापूर) व दरोड्यातील गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला गुंडाजी तानाजी नंदीवाले (वय २८, रा.तमदलगे, ता. शिरोळ) यांचा समावेश आहे. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली.
गुंडाजी नंदीवाले हा राजारामपुरी पोलिसांनी दाखल केलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयित असून, तो १२ डिसेंबर २०१९ पासून कळंबा कारागृहात आहे. प्रतीक सरनाईक या संशयितावर जरगनगरातील युवकाचा गोळ्या घालून खून केल्याप्रकरणी करवीर पोलिसांत गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी तो कळंबा कारागृहात २७ ऑक्टोबर २०१८ पासून आहे. त्याला कोरोनाचा संसर्ग झाला म्हणून ६ मे २०२१ पासून, तर गुंडाजी याला ४ मे २०२१ पासून कैद्यांकरिता तयार केलेल्या आयटीआय वसतिगृहातील तात्पुरत्या कोविड सेंटरमध्ये दाखल केले होेते. दोघेही या केंद्रातील पहिल्या मजल्यावरील मोठ्या हाॅलमध्ये होते. शुक्रवारी मध्यरात्री या दोघांनी न आवाज करता बाजूच्या खिडकीचे गज कापले. अखेरचा गज कापताना एका कैद्याला जाग आली. त्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यादरम्यान दोघांनी खिडकीतून पलायन केले. बाहेरील बंदोबस्तावरील पोलिसांनी बॅटरीचा प्रकाश टाकून पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते त्यांच्या हाती लागले नाहीत.
या दोघांना ठेवलेल्या हाॅलमध्ये एकूण १७ कैद्यांवरही कोरोना उपचार सुरू होते. बंदोबस्तावरील बाहेरील सुरक्षा पोलिसांची होती. त्यांनी तात्काळ ही बाब जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या कानावर घातली. त्यांनीही तात्काळ केंद्रावर धाव घेतली. सर्वच पोलीस ठाण्यांनाही कैदी पळाल्याचे कळविण्यात आले. त्यामुळे शहरातील एन्ट्री पाॅइंटसह सर्वच ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. या काेविड सेंटरला काही मिनिटांतच अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्यासह शहर उपअधीक्षक मंगेश चव्हाण आदी अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. शुक्रवारी दिवसभर या दोन कैद्यांची शोधाशोध सुरू होती. या पलायनामुळे कळंबा कारागृह प्रशासन हादरले असून, त्यांनी आतील बंदोबस्तात वाढ केली. याबाबतचा गुन्हा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाला असून, त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील करीत आहेत.
चौकट
बंदीजन पळून जाण्याची दुसरी वेळ
कोरोनाच्या पहिल्या लाटेतही एक बंदीजन पळून गेला होता. मात्र, तो शोधाशोध केल्यानंतर सापडला. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शुक्रवारी मध्यरात्री असा प्रकार घडला. या कारागृहाच्या बाहेर स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त आहे. आतील बाजूस कारागृहाच्या पोलिसांचा बंदोबस्त असतो. त्यात आतमध्ये कारागृह पोलिसांची संख्या कमी होती. त्यामुळे या बंदीजनांनी पळून जाण्याचे धाडस केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
(फोटो मिळवून देत आहे)