'गडहिंग्लज आयटीआय'ला दोन कोटींचे अनुदान..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:16 AM2021-06-17T04:16:21+5:302021-06-17T04:16:21+5:30
राम मगदूम गडहिंग्लज : कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या कौशल्य विकास योजनेंतर्गत येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला ...
राम मगदूम
गडहिंग्लज : कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या कौशल्य विकास योजनेंतर्गत येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला दोन कोटींचे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे गडहिंग्लज विभागातील ग्रामीण विद्यार्थ्यांच्या औद्योगिक कौशल्य विकासाला मोठे पाठबळ मिळणार आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील ३८ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांसाठी ६८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी येथील आयटीआयला दोन कोटी मिळणार आहेत. अल्प मुदतीचे नवे अभ्यासक्रम आणि अद्ययावत उपकरणे व यंत्रसामग्रीसाठी हा निधी वापरला जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात येथील केंद्राला ८० लाख रुपये प्राप्त झाले आहेत.
दोन कोटींच्या निधीतून सीएनसी, लेथ मशीन, मिलिंग आणि ग्रायडिंग मशीन खरेदी करण्याचे येथील केंद्राचे नियोजन आहे. तसेच सध्या बंद असणाऱ्या यंत्रसामग्रीची दुरुस्ती, तसेच विद्यार्थ्यांसाठी नवीन उपकरणे आणि पुस्तके खरेदी करण्यात येणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची प्रवेश क्षमता असणाऱ्या या केंद्रातील सुमारे ३०० हून अधिक प्रशिक्षणार्थींना दरवर्षी कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळते. येथून बाहेर पडलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी स्वत:चा उद्योग, व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे स्थानिक रोजगार निर्मितीला मदत झाली असून, नव्या अभ्यासक्रमांमुळे त्याला अधिक गती मिळणार आहे.
कोट
सीएनसी लेथ व मशिनिंग, अॅटोमोबाईल (चारचाकी), वेल्डिंग व इलेक्ट्रीकल हे अल्प मुदतीचे नवीन अभ्यासक्रम यंदापासून सुरू करणार आहोत. तसेच इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटीतील स्थानिक उद्योजक तज्ज्ञांकडून विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
- महेश आवटे, प्राचार्य आयटीआय, गडहिंग्लज.
दृष्टिक्षेपात
गडहिंग्लज आयटीआय
- शेंद्री माळावरील २५ एकर प्रशस्त जागेत सुसज्ज इमारतींमध्ये प्रशिक्षण केंद्र.
- ४५० विद्यार्थी क्षमता,
११ विविध अभ्यासक्रम.
- विद्यार्थी वसतिगृहाची सोय.
फोटो ओळी : गडहिंग्लज शहरानजीकच्या शेंद्री माळावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची सुसज्ज इमारत.
क्रमांक : १६०६२०२१-गड-०४