राजापूर बंधारा दुरुस्तीसाठी दोन कोटींचा निधी उपलब्ध
By admin | Published: March 11, 2016 12:03 AM2016-03-11T00:03:18+5:302016-03-11T00:10:21+5:30
गळती थांबणार : नवीन लोखंडी बरगे बसणार, स्थानिक जनतेला दिलासा
संदीप बावचे -- शिरोळ तालुक्याला वरदायिनी ठरलेल्या राजापूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी पाच लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे़ या निधीतून पहिल्या टप्प्यात पाणी गळतीचे काम रोखले जाणार असून, आणखी चार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे़ किमान बंधारा वाचविण्यासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे तालुक्यातील जनतेतून स्वागत होत आहे़
राजापूर बंधारा हा कृष्णा नदीवरील व शिरोळ तालुक्यातील शेवटचा बंधारा आहे़ या बंधाऱ्यातून शेती व पिण्याच्या पाण्यासह इचलकरंजी शहराला पाण्याचा पुरवठा केला जातो़ बंधाऱ्याला एकूण ६५ दरवाजे असून, पाटबंधारे विभागाने लोखंडी व लाकडी बरगे घातलेले आहेत़ मात्र, हे बरगे कमकुवत असल्यामुळे, शिवाय बंधाऱ्याची दुरवस्था झाल्यामुळे सर्वच दरवाजांतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे़ बंधाऱ्याच्या प्रश्नाबाबत आमदार उल्हास पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात विधानसभा सभापतींना निवेदन दिले होते़ दुष्काळसदृश परिस्थिती असताना या बंधाऱ्यातील गळतीतून लाखो लिटर पाणी वाया जात आहे़ याप्रश्नी लक्ष वेधले होते़ दरम्यान, जलसंपदा विभागाकडून केंद्र शासनाच्या १३ व्या वित्त आयोगाअंतर्गत बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी पाच लाख रुपये निधीची तरतूद केली आहे़ या निधीतून लवकरच डागडुजी केली जाणार असून, गळतीही थांबविली जाणार आहे़ चालू वर्षी दोन कोटी पाच लाख रुपयांच्या निधीतून सिमेंट क्राँक्रिटचे जॅकेटिंग करून लोखंडी बरगे घातले जाणार आहेत़
लवकरच कामास सुरुवात
बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी पाच लाखांचा निधी उपलब्ध झाला असून, बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होणार आहे़ बंधारा कमकुवत बनल्यामुळे आणखी निधीची गरज असून, पुढील वर्षी तो निधी शासनाकडून मिळणे अपेक्षित आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अधिकारी शिरीष पाटील यांनी दिली़
यंदा तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतीबरोबर पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिकट बनलेला आहे़ यामुळे राजापूर बंधाऱ्यातील गळतीबाबत शासनाचे लक्ष वेधून बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी केली होती़ त्यानुसार निधीची तरतूद झाली आहे़ उर्वरित आणखी निधीसाठी पाठपुरावा करणार आहे़
- उल्हास पाटील, आमदार.
५
‘गळतीचा फायदा कर्नाटकला, राजापूर बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी वाया’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. गळती बंद करून शिरोळ तालुक्यातील कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांचा यावर्षी तरी पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये यासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता असल्याचे वृत्त प्रसिद्ध करून लोकप्रतिनिधींसह पाटबंधारे विभागाचे लक्ष वेधले होते़