शंभर कोटींसाठी दोन कोटींची सुपारी
By admin | Published: June 19, 2014 01:11 AM2014-06-19T01:11:55+5:302014-06-19T01:13:37+5:30
अतिक्रमणे नियमितीसाठी खेळी : महापालिकेत चर्चा; एका बाजूला विरोध, दुसरीकडे तोडपाणीच्या हालचाली
संतोष पाटील ल्ल कोल्हापूर
महापालिकेच्या कचरा डेपोसाठी तावडे हॉटेलजवळील आरक्षित जागेवर, तसेच गांधीनगर परिसरातील महापालिकेच्या स्वमालकीच्या जागेवर अतिक्रमणे झाली. न्यायालयाचा दणका व प्रसारमाध्यमांचा पाठपुरावा यामुळे महापालिकेने कारवाईचा धडाका लावला. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही १०० कोटींच्या मिळकतीसाठी दोन कोटींची ‘सुपारी’ फुटल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
महापालिकेच्या नावांवर सन १९४५ पासून येथील क ाही मिळकती असूनही उचगाव ग्रामपंचायतीने यावर बेकायदेशीर बांधकामांना परवानगी दिली आहे. जिल्हा न्यायालयाने ही सर्व जागा महापालिकेच्या हद्दीत असल्याचा निकाल दिल्याने बेकायदेशीर बांधकामांवर शिक्कामोर्तब झाले. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमांनुसार हा अदखलपात्र गुन्हाच ठरणार आहे. न्यायालयाच्या निकालानंतर अतिक्रमण कारवाईबरोबरच ग्रामपंचायत सदस्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एकाबाजूला आवाज उठवायचा व दुसऱ्या बाजूला तोडपाणीच्या हालचालीही करण्याची खेळी अनेकजण करत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माजी नगरसेवक संघटनेने अतिक्रमणांची सर्व कागदपत्रे दाखवली होती. कचरा डेपोच्या जागेवरच टोलेजंग इमारती उभारल्याचे पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. इतका सगळा घोळ सुरू असताना महापालिकेचे अधिकारी झोपा काढत होते का? असा सवालही पवार यांनी त्यावेळी उपस्थित केला होता. इतके होवूनही ३८ मिळकती वगळण्याची खेळी करणारे महापालिकेचे अधिकारी अद्याप झोपलेलेच असल्याची सद्य:परिस्थिती दर्शवते.
शासन मंजूर विकास योजनेनुसार मौजे उचगावचे रि.स.नं. ८४, ८७, ९१ ते ९७, १०० ते १०३, ११८ ते १२०, १२२ ते १२५, १३४, १३८, १३७, १४३ या जमिनी कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीत आहेत. उचगाव ते तावडे हॉटेलदरम्यान महापालिकेने कचरा डेपो व ट्रक टर्मिनससाठी आरक्षित केलेल्या ३८ जागांवर १०० कोटींची अवैध बांधकामे सुरू आहेत. हा सर्व प्रकार नगररचना विभागाच्या मेहरबानीमुळेच सुरू असल्याचा आरोप जाहीररित्या करण्यात आला होता. आता या मिळकती वाचविण्यासाठी सुपारी फुटल्याची चर्चा आहे. (क्रमश:)