परतीच्या प्रवाशांकडून कोल्हापुरातील आगारांना दोन कोटींचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:55 AM2017-10-25T11:55:02+5:302017-10-25T12:12:26+5:30
एस. टी. संघटनांनी मागे घेतलेल्या संपानंतर पुन्हा एकदा एस.टी.वर विश्वास दाखवित परतीच्या प्रवाशांकडून कोल्हापूर विभागास फक्त दोन दिवसांत दोन कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.
कोल्हापूर , दि. २५ : न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत एस. टी. संघटनांनी मागे घेतलेल्या संपानंतर परतीच्या प्रवाशांनी पुन्हा एकदा एस.टी.वर दाखविलेल्या विश्वासामुळेच परतीच्या प्रवाशांकडून कोल्हापूर विभागास फक्त दोन दिवसांत दोन कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. कोल्हापुरातील सर्व आगारांत प्रवाशांची गर्दी झाल्याने प्रशासनातर्फे १५० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
सातवा वेतन आयोग लागू करण्यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी एस. टी. कर्मचाऱ्यानी ऐन दिवाळीत पुकारलेला संप चार दिवसांनंतर मागे घेण्यात आला. त्यामुळे शनिवारी (दि. २१) भाऊबीजेदिवशी पहाटेपासून एस. टी. बसगाड्या रस्त्यांवरून धावू लागल्या; पण प्रवाशांना याची पुरेशी कल्पना नसल्याने सकाळपर्यंत गर्दी कमी होती. दुपारी मात्र भाऊबीजेची गर्दी वाढली. तथापि महामंडळास दिवाळीदिवशी अपेक्षित असे उत्पन्न मिळाले नाही.
रविवार व सोमवारी (दि. २२ व २३) परतीच्या प्रवाशांनी एस. टी.ला चांगली साथ दिल्याने अनेक मार्गांवरील एस.टी.चे आरक्षण तुडुंब झाले होते. प्रवाशांची गर्दी पाहता, कोल्हापूर विभागाच्या वतीने ग्रामीण भागांतून तालुका स्तरावर, तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावर १५० गाड्यांचे नियोजन करण्यात आले.
यामध्ये पुणे, सातारा, सांगली, मुंबई, इचलकरंजी, बेळगावासह कोकणातील गाड्यांना जादा गर्दी झाली होती. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागास दोन कोटींचे उत्पन्न मिळाले.
नव्याने दाखल झालेल्या ‘शिवशाही’ला मागणी
या काळात नव्याने दाखल झालेल्या शिवशाही बसेसना सर्वाधिक मागणी दिसून आली. पुणे-मुंबई मार्गावरील सर्व शिवशाही बसेसचे सर्व आरक्षण तुडुंब झाले होते. वातानुकूलित असलेल्या या बसचे भाडे परवडणारे असल्याने अनेकांनी आपला मोर्चा या बसकडे वळविला आहे.
एस.टी.ला प्रवाशांनी पहिली पसंती दिली; त्यामुळे परतीच्या प्रवासासाठी कोल्हापूर विभागाने १५० जादा गाड्यांचे नियोजन केले होते. सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांच्या सांघिक कामामुळेच दोन दिवसांत दोन कोटींचे उत्पन्न कोल्हापूर विभागास मिळाले आहे.
- अतुल मोरे, सहायक वाहतूक अधीक्षक
कोल्हापूर विभागातील आकडेवारी
तारीख किलोमीटर उत्पन्न
- २२ आॅक्टोबर २ लाख ५८ हजार किलोमीटर ८२ लाख ३७ हजार
- २३ आॅक्टोबर २ लाख १० हजार किलोमीटर १ कोटी १७ लाख ६ हजार