दोन कोटींची उलाढाल ठप्प

By admin | Published: July 26, 2016 12:13 AM2016-07-26T00:13:42+5:302016-07-26T00:19:23+5:30

मुद्रांक विक्रेत्यांचा बंद : तहसील कार्यालय, शनिवार पेठ परिसरात शुकशुकाट

Two crores turnover jam | दोन कोटींची उलाढाल ठप्प

दोन कोटींची उलाढाल ठप्प

Next

कोल्हापूर : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुद्रांक विक्रेते (स्टॅम्प व्हेंडर्स) व दस्तलेखनिकांनी महासंघाच्या नेतृत्वाखाली सोमवारी ‘लेखणी बंद’ आंदोलन केले. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे दोन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली.
कमिशनमध्ये दहा टक्क्यांपर्यंत वाढ करावी, ३० हजार रुपयांपर्यंतच्या मुद्रांक विक्रीची परवानगी पूर्ववत करावी, या मागण्यांसाठी मुद्रांक, दस्तलेखनिक महासंघातर्फे सोमवारी ‘लेखणी बंद’ आंदोलन करण्यात आले. त्यात कोल्हापूर शहरासह इचलकरंजी, हातकणंगले, गडहिंग्लज, पन्हाळा, करवीर आदी तालुक्यांतील एकूण अडीचशे विक्रेते, लेखनिक सहभागी झाले.
नेहमी गजबजलेल्या असणाऱ्या करवीर तहसील कार्यालय परिसर, शनिवार पेठ, भाऊसिंगजी रोड परिसरात या बंदमुळे शुकशुकाट पसरला होता. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने सोमवारी मिळकतींच्या खरेदी-विक्री, करार आदी स्वरूपांतील व्यवहार पूर्ण करण्यासाठी बहुतांश नागरिकांनी तयारी केली होती; पण मुद्रांक विक्रेते, दस्तलेखनिकांच्या बंदमुळे त्यांना काहीच करता आले नाही. ज्या नागरिकांना बंदची माहिती नव्हती, त्यांचा मात्र, मुद्रांक न मिळाल्याने अडचण झाली. दरम्यान, महासंघातर्फे मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले.
त्यात कोल्हापुरातील चंद्रकांत भोसले, नितीन बिदरे, राहुल पाटील, रमेश खुटाळे, शंकर यादव आदी विक्रेते सहभागी झाले. तीस हजार रुपयांपर्यंतची मुद्रांक विक्रीची परवानगी कमी करून ती एक हजारपर्यंत केल्याने मुद्रांक विक्रेते व दस्तलेखनिकांचा व्यवसाय मंदावला आहे शिवाय मुद्रांक विक्रीतील कमिशन कमी झाल्याने पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने संबंधित व्यवसाय करणे जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे आम्हा विक्रेते व दस्तलेखनिकांना उदरनिर्वाह योग्य पद्धतीने करता यावा, यासाठी कमिशन वाढवावे आणि तीस हजार रुपयांपर्यंतच्या मुद्रांक विक्रीला पूर्ववत परवानगी देणे आवश्यक आहे. त्यामुळे या मागणीसाठी आंदोलन केले असल्याचे, मुद्रांक विक्रेते सुनील देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘लेखणी बंद’ला शिरोळमधून प्रतिसाद
शिरोळ : विविध मागण्यांप्रश्नी पुकारलेल्या मुद्रांक विक्रेते व दस्तलेखनिक यांच्या लेखणी बंद आंदोलनाला शिरोळमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोमवारी येथील तहसील कचेरी परिसरात शुकशुकाट होता. या बंदमुळे पक्षकारांची मोठी गैरसोय झाली. एक हजार आणि त्यावर मुद्रांक विक्रीचे अधिकार असूनदेखील गेल्या वर्षभरापासून नाकारलेली परवानगी ई-चलन अथवा ईसबीटीआरसाठी शंभर ते दोनशे रुपयांचा बसणारा आर्थिक भुर्दंड याप्रश्नी शिरोळ तालुका दस्तलेखनिक संघटनेच्या वतीने लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. सोमवार आठवड्याचा पहिला दिवस असल्याने विविध शासकीय कामांसाठी तालुक्यातून आलेल्या पक्षकारांची गैरसोय झाली.


महासंघाच्या निर्णयानुसार पुढील दिशा
आमच्या मागण्या रास्त व योग्य आहे. त्यांच्या पूर्ततेसाठी महासंघाने शासनाशी वारंवार पत्र, निवेदनाद्वारे पाठपुरावा केला. मात्र, काहीच झाले नाही. त्यामुळे अखेर आमच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महासंघाच्या नेतृत्वाखाली राज्यभर हे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती करवीर तालुका स्टॅम्प व्हेंडर संघटनेचे अध्यक्ष नितीन शेळके यांनी दिली. ते म्हणाले, ‘लेखणी बंद’ आंदोलन जिल्ह्यातील सर्व मुद्रांक विक्रेते, दस्तलेखनिक सहभागी झाले. एकदिवसीय बंदमुळे सुमारे दोन कोटींची उलाढाल ठप्प झाली. महासंघाच्या निर्णयानुसार आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.

Web Title: Two crores turnover jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.