मंदीमुळे दोन दिवस यंत्रमाग कारखाने बंद

By admin | Published: May 19, 2016 10:16 PM2016-05-19T22:16:47+5:302016-05-20T00:34:56+5:30

उलाढालीत घट : महिनाअखेर ५० टक्के कारखाने बंद पडण्याची भीती

Two-day powerloom closures due to recession | मंदीमुळे दोन दिवस यंत्रमाग कारखाने बंद

मंदीमुळे दोन दिवस यंत्रमाग कारखाने बंद

Next

इचलकरंजी : यंत्रमाग उद्योगातील आर्थिक मंदी दिवसेंदिवस गडद होत असल्याने त्यावर उपाय म्हणून कापड उत्पादनात घट करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश यंत्रमागधारकांनी आठवड्यातून दोन दिवस कारखाने बंद करण्यास किंवा दररोज १६ तासच कारखाने चालू ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम म्हणून आठवड्यास होणाऱ्या एकूण उलाढालीपैकी २०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.सद्य:स्थितीस आलेल्या मंदीच्या परिस्थितीने सन १९९५ नंतर आलेल्या वस्त्रोद्योगातील मंदीची आठवण करून दिली असल्याचे अनेक यंत्रमागधारकांचे म्हणणे आहे. त्यावेळी जागतिकीकरणाच्या उंबरठ्यावर सर्वच उद्योगधंदे उभे असताना अन्य उद्योगांबरोबरच वस्त्रोद्योगातसुद्धा कमालीची मंदी आली होती. त्यावर उपाय म्हणून तत्कालीन केंद्र सरकारने निर्यातीत दर्जाचे कापड उत्पादित व्हावे आणि त्याची निर्यात करून देशाला परकीय चलन मिळावे, या उद्देशाने ‘टेक्निकल अप ग्रेडेशन फंड’ (टफ्स) ही योजना खास वस्त्रोद्योगासाठी राबविली. त्यातूनच वस्त्रोद्योगाला ऊर्जितावस्था आली.
दीड वर्षांपूर्वी केंद्र व राज्य सरकारांमध्ये सत्ताबदल झाला. नव्याने आलेल्या सरकारमुळे वस्त्रोद्योगात ‘अच्छे दिन’ येतील, अशी अपेक्षा असताना झाले उलटेच. सरकारच्या दुर्लक्षामुळे वस्त्रोद्योगातील विकेंद्रित क्षेत्रात असलेल्या यंत्रमाग उद्योगामध्ये असलेली मंदी अधिक गडद झाली. सध्या सुताच्या वाढलेल्या दरामुळे कापडाचा उत्पादन खर्च वाढला आहे; पण कापडाचे भाव मात्र उतरल्यामुळे कापड उत्पादक, यंत्रमागधारक व व्यापारी नुकसानीत आले आहेत. त्याचा परिणाम म्हणून इचलकरंजी व परिसरातील यंत्रमागधारकांना दररोज दीड कोटींहून अधिक रुपयांचा तोटा होत असल्याची माहिती इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी दिली.गेल्या महिन्याभरापासून कापड उत्पादनात घट करण्याचा निर्णय यंत्रमागधारकांनी घेतला आहे. आठवड्याला सलग दोन सुट्या किंवा आठ तासांच्या दोन पाळ्या चालवून कापड उत्पादन कमी केले जात आहे. शहराबरोबरच आसपासच्या ग्रामीण भागातसुद्धा चार किंवा पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)


नुकसान टाळण्यासाठी उत्पादन कमी
सूत व कापड व्यापाऱ्यांच्या सट्टेखोरीमुळे यंत्रमाग उद्योगामध्ये आर्थिक मंदी मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. सुताचे दर वाढले की, कापडाचे भाव वाढत नाहीत आणि सुताचे भाव कमी झाले की, ताबडतोब कापडाचे भाव उतरले जातात. अशा प्रवृत्तींमुळे या मंदीचे सावट अधिक गडद झाले आहे. कापड उत्पादन जास्त, तितके नुकसान जास्त. म्हणून कापड उत्पादक यंत्रमागधारकांनी कापड उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. चालू महिनाअखेरीस यंत्रमाग कापडाचे उत्पादन सुमारे ५० टक्क्यांनी कमी झाल्याने कारखाने मोठ्या प्रमाणावर बंद पडू लागतील, अशी प्रतिक्रिया पॉपलीन क्लॉथ उत्पादक यंत्रमागधारक संघटनेचे सचिन हुक्किरे यांनी व्यक्त केली.

Web Title: Two-day powerloom closures due to recession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.