प्लास्टिकच्या पिशवीत दोन दिवसांची ‘नकुशी’
By admin | Published: May 19, 2016 11:35 PM2016-05-19T23:35:09+5:302016-05-20T00:31:49+5:30
ऋणमुक्तेश्वर परिसरातील घटना : नवजात बालिका पाहून नागरिकांचे डोळे पाणावले; ‘सीपीआर’मध्ये सुखरुप
कोल्हापूर : दाटीवाटीची लोकसंख्या... बहुतांश कुंभार आणि जोशी समाजाची वस्ती... आणि मध्यवस्तीत असलेली भाजी मंडई... छोटे-छोटे बोळ अशी भौगोलिक रचना असलेला गंगावेश परिसरातील ऋणमुक्तेश्वर भाग... या छोट्याशा बोळामध्ये गुरुवारी सकाळी प्लास्टिक पिशवीमध्ये दोन दिवसांच्या नवजात बालिकेला ठेवले असल्याचे उघडकीस आले. तिला पाहून नागरिकांचे डोळे पाणावले. कुण्या मातेने इतके सुंदर बाळ छातीवर दगड ठेवून असे रस्त्यावर सोडून दिले असेल याचीही चर्चा सुरु राहिली. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हे बाळ आता सीपीआर रुग्णालयात सुखरुप आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, ‘कुंभार गल्ली-ऋणमुक्तेश्वर मंदिर परिसरातील बोळामध्ये राहणाऱ्या जमेला इस्माईल शेख या गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर आल्या. त्यावेळी त्यांच्या घराच्या कठड्यावर प्लास्टिकची पिशवी असल्याचे निदर्शनास आले. त्यांना कुणीतरी ही पिशवी ठेवली असल्याचे प्रथम वाटल्याने त्यांनी ती उचलली असता त्यातून नवजात अर्भक
खाली पडले. त्यांनी पाहिले तर गुटगुटीत, टपोरे डोळे असलेली नवजात बालिका गाऊनमध्ये लपटलेली त्यांना दिसली.
त्यांनी मुलगा सलीम यांना बोलावले. त्यांनी त्या बालिकेला उचलून घेतले. याचवेळी शेजारील नागरिक आले. त्यांनी त्या गोंडस मुलीला मायेने कुरवाळले. सकाळच्या वेळेत रोज या ठिकाणी भाजी मंडई भरते. नागरिकांबरोबर भाजी विक्रेतेही तेथे आले. त्या नवजात बालिकेला पाहून नागरिक गहिवरले. त्यानंतर सलीम शेख यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी या नवजात बालिकेविषयी नागरिकांकडे चौकशी केली; पण स्थानिक नागरिकांना कांहीच माहिती नव्हती. पोलिस उपनिरीक्षक मनीषा गबाले व महिला कर्मचाऱ्यांनी या बालिकेला छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) प्रसूती विभागात उपचारासाठी नेले.
पोलिस ही नवजात बालिका आली कुठून आणि तिला तिथे कोणी ठेवले याबाबत माहिती घेत आहेत. याप्रकरणी दुपारी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
‘नकुशी’ची जबाबदारी सोमवारपर्यंत संस्थेकडे
1येथील ऋणमुक्तेश्वर मंदिर परिसरात सापडलेल्या नवजात बालिकेचा ताबा सोमवार (दि. २३)पर्यंत बालकल्याण संकुल किंवा जरगनगर परिसरातील शिशू आधार केंद्राकडे दिला जाणार आहे. बालकल्याण समितीने त्यासंबंधीची प्रक्रिया गुरुवारीच सुरू केली.
2अशा बाळांच्या पालकांचा शोध घेणे हे पोलिसांसमोर आव्हानच असते.असे एखादे अपत्य कुठेही बेवारस स्थितीत सापडल्यास त्याची पहिली माहिती पोलिसांना कळविणे आवश्यक असते. पोलिस त्या बाळास ताब्यात घेऊन तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करतात व बालकल्याण समितीस तसे कळवितात.
3बालकल्याण समितीच्या कोल्हापुरातील समितीच्या प्रिया चोरगे या अध्यक्षा आहेत. अतुल भोसले, प्रा. दीपक भोसले, आदी सदस्य आहेत. अशा बाळांचे संगोपन करू शकतील अशा बालकल्याण संकुल व डॉ. प्रमिला जरग यांचे ‘शिशू आधार गृह’ अशा दोन स्वयंसेवी संस्था आहेत. बाळ जेव्हा ‘सीपीआर’मधून डिस्चार्ज होईल तेव्हा यांपैकी एका संस्थेकडे त्याची जबाबदारी सोपविली जाईल.
4बाळ उघड्यावर सोडलेले असल्याने त्याच्यावर औषधोपचारांची गरज असते. ते केल्यानंतर सोमवारपर्यंत ते संस्थेकडे सोपविण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. त्यानंतर हे अपत्य कुणाचे आहे, याचा शोध पोलिसांकडून घेतला जातो. त्यासाठी किमान दोन महिन्यांचा अवधी असतो. त्या काळात पालक स्वत:हून पुढे आले नाहीत तर बालकल्याण समितीच हे बाळ दत्तक प्रक्रियेसाठी मुक्त केले जात असल्याचा आदेश काढते. त्यानंतर रीतसर कायदेशीर दत्तकविधान प्रक्रिया राबवून बाळास दत्तक देऊन त्याचे कायमस्वरूपी पुनर्वसन केले जाते.दत्तक देऊन त्याचे कायमस्वरूपी पुनर्वसन केले जाते.
5ही नवजात बालिका कुणाची आहे, यासंबंधी कुणास काही माहिती असल्यास ती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
6हे बाळ त्याच परिसरातील कुणीतरी आणून सोडले असेल, अशी शक्यता फारच कमी असते. तिथे शेजारीच ‘केएमटी’चा बसथांबा आहे. रंकाळा एस. टी. बसस्थानकही आहे. मंडईत ग्रामीण भागांतून मोठ्या संख्येने लोक येतात. त्यामुळे इतरही कोठून तरी अर्भक ठेवले गेले असण्याची शक्यता आहे. पिशवीत भाजी भरून ठेवावी तसे ते ठेवण्यात आले होते.
दैव बलवत्तर...
भाजी मंडई असल्याने या परिसरात नेहमी भटक्या व मोकाट कुत्र्यांचा वावर असतो; पण सुदैवाने ही बालिका सुखरुप मिळून आली.
गुरुवारी सकाळी साडेपाच वाजता मी घराबाहेर आले. त्यावेळी काही नव्हते; पण थोड्या वेळाने बाहेर आले तेव्हा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये नवजात बालिका मला दिसली. आम्ही तत्काळ हा प्रकार पोलिसांना कळविला.
- जमेला शेख
बालिका सुदृढ...
या दोन दिवसांच्या नवजात बालिकेचे वजन दोन किलो ६०० ग्रॅम आहे. नवजात असल्याने तिच्या प्रकृतीला धोका निर्माण होऊ नये म्हणून नवजात शिशू व अतिदक्षता विभागात आणखी दोन -तीन दिवस ठेवण्यात येणार असल्याचे सीपीआरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.शिशीर मिरगुंडे यांनी सांगितले.
कोल्हापुरातील गंगावेश परिसरामधील ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळील एका बोळामध्ये गुरुवारी पहाटे दोन दिवसांची नवजात बालिका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सापडली. या प्रकरणाची लक्ष्मीपुरी पोलिस जमेला शेख यांच्याकडून माहिती घेत होते.