ग्रोबेझ आर्थिक फसवणूकप्रकरणी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या दोघा कर्मचाऱ्यांना अटक
By समीर देशपांडे | Published: April 3, 2023 04:39 PM2023-04-03T16:39:16+5:302023-04-03T17:07:04+5:30
जिल्हा परिषदेतील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही कोळी यांच्याकडे पैसे गुंतवल्याने त्यांचे धाबे दणाणले
कोल्हापूर : ग्रोबझ कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील सहायक लेखाधिकारी शिवाजी बापू कोळी (वय ५७) आणि त्याचा मुलगा ग्रामसेवक स्वप्नील शिवाजी कोळी (वय ३१, दोघे रा. विश्रामबाग सांगली) या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी (दि. ३) सांगलीतून अटक केली. हे दोघे या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आहेत.
न्यायालयात हजर केले असता शिवाजी कोळी याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली असून, त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. स्वप्नील कोळी याला आठ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. कोळी पिता-पुत्राने अन्य १८ साथीदारांसह जानेवारी २०२१ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत गुंतवणूकदारांची ९ कोटी ४१ लाख ५० हजार ७८९ रुपयांची फसवणूक केली.
याबाबत गतवर्षी ऑक्टोबरमध्ये शाहूपुरी पोलिस ठाण्यात ग्रोबझसह चार कंपन्या आणि २० संशयितांवर गुन्हा दाखल झाल्यापासून कोळी पिता-पुत्र अटक टाळण्यासाठी पसार होते. तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांच्या पथकाने सोमवारी सांगलीतील विश्रामबागमधील घरातून त्यांना अटक केली.
जिल्हा परिषदेत खळबळ
गेल्या वर्षभरापासूनच कोळी पिता-पुत्रांच्या कारनाम्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले. त्यानंतर शिवाजी कोळी गायब झाल्याने तो अनधिकृत रजेवर होता. करवीर पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेला त्याचा मुलगा स्वप्नील हादेखील गुन्हा दाखल होताच गायब झाला होता. अखेर या दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.
शासकीय अधिकारी असल्याने विश्वास
जिल्हा परिषदेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवाजी कोळी कार्यरत असल्यामुळे अनेकांचा त्याने विश्वास संपादन केला होता. तो एवढ्या मोठ्या पदावर कार्यरत असल्याने आपली फसवणूक होणार नाही असे गृहित धरून अनेकांनी पैसे गुंतवले. मात्र आता ते सगळेजण अडचणीत आले आहेत.
तर होणार निलंबन
कोळी याचा मूळ विभाग वित्त आहे आणि सध्या तो समाजकल्याण विभागाकडे होता. त्याचा मुलगा स्वप्नील हा ग्रामपंचायत विभागाकडे होता. जिल्हा परिषदेचे हे दोन्ही कर्मचारी असल्याने शाहुपुरी पोलिसांनी सोमवारी दुपारीच या दोघांना अटक केल्याचे लेखी पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केले. या दोघांचे लवकरच निलंबन होण्याची शक्यता जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली.
नऊ संशयित अटकेत
ग्रोबझ फसवणुकीच्या गुन्ह्यातील एकूण २० संशयित आरोपींपैकी ९ संशयितांना पोलिसांनी अटक केली. पाच संशयितांनी न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन मिळवला आहे, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.