टिचभर बांधासाठी दोन कुटुंबे उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:29 AM2021-02-17T04:29:29+5:302021-02-17T04:29:29+5:30
कोपार्डे : आडूर (ता. करवीर) येथे टिचभर बांधाच्या हद्दीवरून दोन सख्ख्या भावांत वाद झाला आणि या किरकोळ वादातून एकचा ...
कोपार्डे : आडूर (ता. करवीर) येथे टिचभर बांधाच्या हद्दीवरून दोन सख्ख्या भावांत वाद झाला आणि या किरकोळ वादातून एकचा जीव गेला आणि दुसरा भाऊ व त्याचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात गेल्याने दोन्ही कुटुंबे आर्थिक व मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाली आहेत.
आडूर येथे पाच भावांचे भोसले कुटुंब आहे. त्यांची एकत्र शेती विभक्त कुटुंब झाल्यानंतर वाटणी करण्यात आली. बांधाच्या हद्दीवरून यशवंत व विलास या दोन भावांत गेले दोन महिने धुसफूस होती. यशवंतचा मुलगा सागरने चुलता विलास याची आदल्यादिवशी समजूत काढली होती. हा वाद कायमचा मिटावा म्हणून नातेवाईक बाजीराव सूर्यवंशी व बाळासाहेब हावलदार हे नातेवाईक शुक्रवारी आले. हद्दीवर सिमेंटचे नंबर टाकताना मागील हेवेदावे उफाळून आले. नातेवाईकांनी समजूत काढलीही आणि ते दुसऱ्या बाजूला बांधाची हद्द पाहायला गेले. एवढ्यात विलासचा मुलगा तेथे आला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. किरकोळ वादातून एका भावाचा जीव गेला तर दुसरा भाऊ व पुतण्या पोलीस कोठडीत गेले.
भोसले कुटुंब पाचही भाऊ अत्यंत मितभाषी. ज्याचा वाद झाला त्यातील विलास हा कुंभी कासारी कारखान्यात नोकरीला आहे. याला दोन मुले यातील एकाचा सहा महिन्यांपूर्वी अपघाती मृत्यू झाला आहे. दुसरा अतुल महाविद्यालयात शिक्षण घेत आहे तर मृत यशवंत घरची शेती सांभाळत पंक्चरचे दुकान चालवत होता. सगळे व्यवस्थित सुरू होते पण टिचभर बांधासाठी वादात एका भावाचा जीव गेला व दुसरा पोलिसांच्या संशयाच्या जाळ्यात अडकला आणि दोन्ही कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.