खंडाळा तालुक्यात वीज कोसळून दोन शेतकरी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:19 AM2021-05-03T04:19:22+5:302021-05-03T04:19:22+5:30
शिरवळ (जि. सातारा) : कवठे (ता. खंडाळा) येथील वेताळाचा माळ नावाच्या शिवारात रविवारी दुपारी झोपडीवर वीज कोसळून दोन शेतकरी ...
शिरवळ (जि. सातारा) : कवठे (ता. खंडाळा) येथील वेताळाचा माळ नावाच्या शिवारात रविवारी दुपारी झोपडीवर वीज कोसळून दोन शेतकरी जागीच ठार झाले आहे. शशिकांत दादासाहेब लिमन (वय ३५, रा. झगलवाडी, ता. खंडाळा) व खाशाबा भाऊसाहेब जाधव (६०, रा. कवठे, ता. खंडाळा) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे झगलवाडीसह कवठे गावावर शोककळा पसरली आहे.
रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शशिकांत लिमन, खाशाबा जाधव हे भुईमुगाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. दुपारी एकच्या दरम्यान शेतामधील झोपडीवजा खोपीमध्ये शशिकांत लिमन व खाशाबा जाधव हे जेवणाकरिता बसले होते. याचवेळी खाशाबा जाधव यांची पत्नी व मुलगा हे दोघे झोपडीच्या बाजूला बसले होते. यावेळी अचानक वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडात होत पाऊस सुरू झाला. दरम्यान, १.३० वाजण्याच्या दरम्यान अचानकपणे विजांचा मोठा आवाज होत विजांचा लोळ जेवणाकरिता बसलेल्या शशिकांत लिमन व खाशाबा जाधव यांच्या झोपडीवर पडला. यात शशिकांत लिमन व खाशाबा जाधव दोघेही ठार झाले.
--------------------------
साताऱ्याला वळवाने पाऊण तास झोडपले...
सातारा : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून वळवाचा पाऊस होत असून, रविवारी सायंकाळच्या सुमारास सातारा शहर आणि परिसराला झोडपले. जवळपास पाऊण तास ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात पाऊस पडत होता. या पावसामुळे शहरातील वीजपुरवठाही खंडित झाला होता. तसेच पाऊस झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.
--------------------------
कोल्हापुरात हलक्या सरी
कोल्हापूर : दिवसभराच्या कडक उष्णतेच्या झळा आणि घामांच्या धारांवर रविवारी चारनंतर आलेल्या वादळी पावसाच्या हलक्या सरींनी गारव्याची फुंकर घातली. ढगांच्या गडगडाटासह आलेल्या या पावसाने कुठे तुरळक, तर कुठे काहीशा जोरदार सरींचा वर्षाव झाला.
--------------------------
सांगली जिल्ह्यात वळवाच्या पावसाने पुन्हा हानी
सांगली : जिल्ह्यात शनिवारी व रविवारी वळीव पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी शेतीचे, विजेच्या तारांचे नुकसान झाले आहे.
मिरज पूर्व भागात शनिवारी रात्री पाऊस झाला. वादळी वाऱ्याने विजेची तार पत्र्यावर पडल्याने शेडमधील शेळी ठार झाली. विजयनगर येथील केळीच्या बागा, द्राक्षबागा उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. रविवारी पुन्हा शिराळा तालुक्यातील चरण, चांदोली परिसरात, तसेच वाळवा तालुक्यातील पेठ येथे पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात गेला आठवडाभर वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस, तसेच गारपीटही होत आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारीही जिल्ह्याच्या बहुतांश भागात ढगांची दाटी होती.