दुचाकी दुभाजकाला धडकून दोन मित्र ठार
By admin | Published: March 27, 2016 01:17 AM2016-03-27T01:17:38+5:302016-03-27T01:17:38+5:30
कावळा नाक्याजवळ घटना : दोघेही महाविद्यालयीन विद्यार्थी
कोल्हापूर : भरधाव मोटारसायकल मेरी वॉनलेस रुग्णालयासमोरील दुभाजकाला धडकून गंभीर जखमी झालेल्या दोघा मित्रांचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. विशाल मोहन रोहिडा (वय २०, रा. रुईकर कॉलनी), आदित्य हरीश चंदवाणी (१९, रा. हरी निवास, सुर्वेनगर- ताराबाई पार्क) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली.
विशाल रोहिडा व आदित्य चंदवाणी हे पुण्याच्या मित्राला सोडण्यासाठी शुक्रवारी (दि. २५) रात्री अकराच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकावर आले होते. मित्राला खासगी ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये बसवून ते मोटारसायकलवरून गांधीनगर येथील मित्राला भेटण्यासाठी गेले. तेथून ते मध्यरात्री पुन्हा मध्यवर्ती बसस्थानकावर आले. याठिकाणी त्यांनी नाष्टा व कॉफी घेतली. त्यानंतर आदित्यला घरी सोडण्यासाठी ते कावळा नाक्याच्या दिशेने भरधाव निघाले. मेरी वॉनलेस रुग्णालयासमोर येताच विशालचा मोटारसायकलवरील ताबा सुटून ती रस्ता दुभाजकाला धडकली. त्यात दोघेही डोक्याला गंभीर दुखापत होऊन बेशुद्ध पडले. ताराराणी अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांना ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याजवळील ओळखपत्रांवरून त्यांची ओळख पटली. शाहूपुरीचे पोलिस हवालदार रवी पाटील यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून नातेवाइकांना ‘सीपीआर’मध्ये बोलावून घेतले. आदित्य हा बंगलोर येथे हॉटेल मॅनेजमेंटचे, तर विशाल हा भारती विद्यापीठात शिक्षण घेत होता. या दोघांच्या मृतदेहांवर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाताची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली.
बहिणीपाठोपाठ भावाचाही अपघाती मृत्यू
आदित्यची थोरली बहीण श्रुतिका चंदवाणी ही पुण्यामध्ये जाहिरात एजन्सीमध्ये काम करीत होती. मित्रांसोबत कोल्हापूरला येताना पुण्याजवळील नीरा नदीपात्रात कार कोसळून २०१३ मध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दु:खातून सावरण्याआधीच चंदवाणी कुटुंबियांवर आदित्यच्या अपघाती मृत्यूचा आघात झाला. कुटुंबीयांचा आक्रोश हृदय हेलावणारा होता. त्याचे वडील हरीश, आई प्रमिला यांची केविलवाणी अवस्था पाहून नातेवाइकांचेही डोळे भरून आले. (प्रतिनिधी)