शेततळ्यात बुडून दोन मुलींचा मृत्यू
By admin | Published: September 12, 2016 01:03 AM2016-09-12T01:03:38+5:302016-09-12T01:03:38+5:30
गडहिंग्लज तालुक्यातील कडगावची घटना : एकीला वाचविताना दुसरीही पडली पाण्यात
गडहिंग्लज : खेळता-खेळता पाय घसरून शेततळ्यात पडलेल्या दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. धनश्री पांडुरंग सागर (वय ९, रा. कडगाव, ता. गडहिंग्लज) आणि सविता परशुराम विभूते (११, सध्या रा. कडगाव, मूळ गाव शिरगाव, ता. चिक्कोडी) अशी या मुुलींची नावे आहेत.
पोलिसांकडून आणि घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, कडगावपासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावरील अण्णा मार्गानजीक सागर खोरे नावाची वसाहत आहे. त्याच परिसरात पांडुरंग सागर यांच्या कुटुंबाचे वास्तव्य आहे. अलीकडेच कर्नाटकातून मोलमजुरीसाठी आलेले विभूते कुटुंबही त्याच ठिकाणी राहते.
या परिसरातील बाळासाहेब देसाई यांच्या शेतात खोदण्यात आलेल्या शेततळ्यानजीक धनश्री व सविता दुपारी खेळायला गेल्या होत्या. तळ्याच्या काठावर खेळत असताना प्लास्टिक कागदावरून पाय घसरून सविता तळ्यात पडली. तिला वाचविण्यासाठी धनश्रीने पाण्यात उडी घेतली. मात्र, घाबरलेल्या सविताने तिला मिठी मारल्यामुळे दोघीही पाण्यात बुडाल्या. मुलींच्या ओरडण्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी शेततळ्याकडे धाव घेतली. तोपर्यंत दोघीही पाण्यात गुदमरल्या होत्या. दोघींनाही तत्काळ पाण्याबाहेर काढून उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. दोन्ही गरीब शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या दुर्दैवी मृत्यूने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
पोहता येत असनूही..!
पहिल्यांदा शेततळ्यात पडलेल्या सविताला पोहता येत नव्हते. तिच्यापेक्षाही वयाने लहान असणाऱ्या धनश्रीला पोहता येत होते. तिने जिवाची पर्वा न करता मैत्रीण सविताला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, सविताने घाबरून धनश्रीला मिठी मारल्यामुळे सविताला वाचविण्यासाठी गेलेल्या धनश्रीलाही प्राणाला मुकावे लागले.
‘धनश्री’ एकुलती एक
पांडुरंग सागर यांना धनश्री ही एकुलती एक होती. जरळी येथील मामाकडे राहणारी धनश्री तिसरीमध्ये शिकत होती. गणपतीसाठी ती गावी आली होती. तिच्या दुर्दैवी मृत्यूने सागर कुटुंबीयांवर, तर पोटासाठी परगावी आलेल्या सविताच्या मृत्यूने विभूते कुटुंबीयांवर आभाळ कोसळले आहे.
कुंपण असूनही घात झाला
यंदाच्या समाधानकारक पावसामुळे शेततळे भरले आहे. अंदाजे ८ ते १० फूट पाणी असल्यामुळे धोका नको म्हणून देसाई यांनी तळ्याभोवती तारेचे कुंपण मारले आहे. तरीदेखील अनवधानाने त्या तळ्याकाठी गेल्या आणि घात झाला.