दोन आजी, एक माजी कोण मारणार 'बाजी'

By admin | Published: October 28, 2015 12:40 AM2015-10-28T00:40:20+5:302015-10-28T00:42:37+5:30

'सुशिक्षितांचा प्रभाग’ अशी ओळख : नवख्या आणि तगड्या उमेदवारांचे तुल्यबळ आव्हान

Two grandmothers, who will kill a former 'betrayal' | दोन आजी, एक माजी कोण मारणार 'बाजी'

दोन आजी, एक माजी कोण मारणार 'बाजी'

Next

कोल्हापूर : दोन विद्यमान नगरसेवक, एक माजी नगरसेवक, उद्योजक, कार्यकर्ता आणि अपक्ष यांच्यात प्रभाग क्रमांक ३९, राजारामपुरी एक्स्टेंशनमध्ये चुरशीची लढत रंगली आहे. या प्रभागातून सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यात काँग्रेसकडून अतुल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुरलीधर जाधव, भाजपचे विजय जाधव, शिवसेनेचे प्रदीप पोवार आणि जनार्दन कोरे, राजू पसारे, माधव सबनीस हे अपक्ष म्हणून लढत आहेत.
हा प्रभाग ‘सर्वसाधारण’साठी खुला झाल्याने विद्यमान नगरसेवकांसह अनेक दिग्गज या प्रभागातून निवडणूक लढविण्यासाठी तयारी करीत आहेत. त्याच प्रभागाशेजारील प्रभाग क्रमांक ३७ हा महिलांसाठी आरक्षित झाल्याने व त्यातील दिग्गजांनी या प्रभागाकडे मोर्चा वळविल्याने येथे आता प्रतिष्ठेची व दिग्गजांची लढत पाहण्यास मिळत आहे. ‘उच्चशिक्षित आणि सुशिक्षितांचा प्रभाग’ अशी ओळख असलेल्या ‘राजारामपुरी एक्स्टेंशन’मध्ये गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे राजू पसारे निवडून आले होते. मात्र, यावेळी त्यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली. त्यावर त्यांनी बंडखोरी करून ते अपक्ष म्हणून लढत आहेत. प्रभागात केलेली विकासकामे घेऊन ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. त्यांना नाकारून काँग्रेसने अतुल पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे संचालक असलेले अतुल पाटील हे आजवर विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्यांच्या शिदोरीवर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विकासाच्या विविध योजना हा त्यांच्या प्रचारातील मुद्दा आहे. जनसुराज्य पक्षाचे विद्यमान नगरसेवक मुरलीधर जाधव हे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात उतरले आहेत. त्यांचा हक्काचा तवनाप्पा पाटणे हायस्कूल प्रभाग ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाल्याने, ते या प्रभागातून निवडणूक लढवित आहेत. तवनाप्पा पाटणे हायस्कूल प्रभागासह शेजारील अन्य प्रभागांत केलेल्या विकासकामांचा आरसा दाखवत, विकासाची ग्वाही देत ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.
दोन वेळा नेतृत्व केलेले माजी नगरसेवक प्रदीप पोवार हे शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या पत्नी सुषमा यांनी सुद्धा याच प्रभागातून प्रतिनिधित्व केले आहे. महापालिकेतील तीन टर्मचा अनुभव, पूर्वीची विकासकामे यांच्या जोरावर ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. या आजी-माजी नगरसेवकांना काँग्रेसच्या अतुल पाटील यांच्यासह भाजपच्या विजय जाधव यांनी आव्हान दिले आहे. जाधव हे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. गेल्या दहा वर्षांपासून या प्रभागात त्यांनी अनेक नागरी समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केला आहे. हा पाठपुरावा आणि पालकमंत्री पाटील यांच्या फंडातून केलेली विकासकामे घेऊन ते मतदारांना साद घालत आहेत. माधव सबनीस आणि जनार्दन कोरे हे अपक्ष म्हणून लढत आहेत. एकंदरीत पाहता या सप्तरंगी लढतीत आजी-माजी नगरसेवकांना नवख्या अन् तगड्या उमेदवारांनी आव्हान दिले आहे. ( प्रतिनिधी )

उमेदवारांचा कस लागणार
‘उच्चशिक्षित व सुशिक्षित प्रभाग’ असल्याने या ठिकाणी आर्थिक प्रलोभनांना बळी पडणारे मतदार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पक्ष, उमेदवार, त्याचे चारित्र्य आणि काम करण्याची क्षमता यांचा विचार मतदार करणार आहेत. त्यामुळे प्रचारात उमेदवारांचा कस लागत आहे. प्रभागात एकूण ५२०० मतदारसंख्या आहे. यात मराठा समाज सर्वाधिक २६९१, ब्राह्मण समाज ११६५, सिंधी ७५, लिंगायत १६०, जैन १४१, दाक्षिणात्य ४१, साळी ४१, मारवाडी १७०, गुजराती २८, मागासवर्गीय २५४, मुस्लिम १४९, धनगर १९, ख्रिश्चन ८, बंगाली ३, उत्तर भारतीय १४, शिंपी २८, नाभिक १७, सुतार २१, सोनार १४, उर्वरित १५० असे साधारणत: मतदार आहेत.

Web Title: Two grandmothers, who will kill a former 'betrayal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.