कर्जमाफीवरून राज्यमंत्रिमंडळात दोन गट

By Admin | Published: July 5, 2017 06:48 PM2017-07-05T18:48:41+5:302017-07-05T18:48:41+5:30

सतेज पाटील यांची घणाघाती टीका : कॉँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Two groups in the state ministries due to debt waiver | कर्जमाफीवरून राज्यमंत्रिमंडळात दोन गट

कर्जमाफीवरून राज्यमंत्रिमंडळात दोन गट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेतकरी संप मागे घेताना मंत्रिगटाचे प्रमुख तथा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सरसकट कर्जमाफीची घोषणा केली, मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिगटाच्या निर्णयाला बांधिल का नाहीत. मंत्रिगटाने घेतलेला निर्णय मुख्यमंत्र्यांना मान्य नाही आणि मुख्यमंत्र्यांची अपेक्षा मंत्रिगटाला माहिती नसल्याने राज्यमंत्रिमंडळात उघडउघड दोन गट पडल्याची घणाघाती टीका कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केली. प्रामाणिक परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान द्या, यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यावेळी आमदार पाटील बोलत होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कर्जमाफीच्या धोरणावर सडकून टीका करताना आमदार सतेज पाटील म्हणाले, मंत्रिगटाने सरसकट कर्जमाफीची घोषणा केल्याने राज्यातील शेतकऱ्याला आनंद झाला; पण त्यातील जाचक अटी पाहता सरकारची प्रामाणिक भावना लक्षात येते. दीड लाखावरील शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम भरली तरच त्यांना लाभ होणार. शेतकऱ्यांकडे लाखो रुपये पडून असते तर त्याने आत्महत्या केल्या असत्या का? प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान देणार आहे; पण यातून प्रत्यक्षात किती रक्कम पदरात पडणार आहे. एका घरातील एकाच खातेदाराला कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. या सगळ्या अटी पाहता सरकारला शेतकऱ्यांचा सात/बारा कोरा करायचा नाही, हे स्पष्ट होते. फसव्या कर्जमाफी योजनेचा भांडाफोड करण्यासाठी यापुढे कॉँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होणार असून, जर त्रुटी दूर करून सरसकट कर्जमाफी दिली नाही, तर आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करू. त्याची सुरुवात म्हणून येत्या आठ दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाने करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. यावेळी हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. चौकट साहेब नालासाठी घोडे घ्यायचे का? जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना सर्वच कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका मांडल्या. दीड लाखापेक्षा अधिक रक्कम आमच्या जवळ असती तर कर्जमाफीसाठी तुमच्याकडे हात पसरले असते का? सरकारची कर्जमाफी म्हणजे नालासाठी घोडे विकत घेतल्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया संजय पाटील यांनी व्यक्त केली. चौकट पंक्तीत बसवून उपाशी ठेवण्याचे पाप कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांना पंक्तीत बसवून त्यांच्यासमोर ताटावर ताट झाकून ठेवले; पण ताट उघडल्यानंतर तांदूळ व कच्ची भाजी तशीच ठेवलेली दिसते. पंक्तीत बसवून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना उपाशी ठेवण्याचे पाप भाजप सरकारने केले असून, याचा जाब आगामी काळात शेतकरी निश्चितच विचारतील, असेही पाटील यांनी सांगितले.

Web Title: Two groups in the state ministries due to debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.